बोरबनच्या गडगे कुटुंबियांचा आईच्या दशक्रियेनिमित्त अनोखा उपक्रम मोगर्‍याच्या रोपांचे वाटप करत सामाजिक कार्यासाठी केली आर्थिक मदत

328

नायक वृत्तसेवा, घारगाव
आईच्या दशक्रिया दिनी (गुरुवार, ता.17) आणि प्रेमापोटी संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील गडगे कुटुंबियांनी ग्रामस्थांना व उपस्थितांना तब्बल अकराशे मोगर्‍याच्या रोपांचे वाटप केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी संस्था आणि मंदिरासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या अनोख्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोरबन येथील दत्तात्रय, सुनील व ज्ञानदेव गडगे यांच्या मातोश्री रंगुबाई गडगे यांचे मंगळवार दिनांक 8 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले होते. आईने दिलेली संस्काराची शिदोरी आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा वारसा जपत गडगे कुटुंबियांनी दशक्रियेला अनोखा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यामुळे गुरुवारी (ता.17) झालेल्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकाला एकूण अकराशे मोगर्‍याच्या रोपट्यांचे वाटप केले. तसेच समाजातील अनेक वृद्ध, अनाथ, बेवारस, दुर्लक्षित घटक आणि धार्मिक कार्यात सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या संस्थांनाही एक लाख रुपयांची मदत केली.

या मदतीची आधार फाऊंडेशनला अकरा हजार रूपये, बोरबन येथील दिव्यांग बांधव पांडुरंग भुतांबरे यांना अकरा हजार रूपये, गावातील मंदिराच्या बांधकामासाठी एकावन्न हजार रूपये, खांडगाव येथील सेवाभावी संस्थेसाठी अकरा हजार रूपये आणि आदी संस्था अशी विभागणी केली आहे. यामुळे मातोश्री रंगुबाई गडगे यांच्या चिरंतन स्मृती स्मरणात राहण्यासाठी आणि त्यांनी समाजाचे उत्तरदायित्व निभावण्याची दिलेली शिकवण यापुढेही अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविल्याची भावना गडगे कुटुंबियांनी व्यक्त केली. विशेषतः परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यातही कायमच गडगे कुटुंबियांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.

Visits: 162 Today: 1 Total: 1794907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *