अनधिकृत बैलगाडी जुगाडावर कारवाईसाठी छावाचे घेरावो आंदोलन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यात अनधिकृत ट्रॅक्टरला जोडलेली बैलगाडी जुगाडामुळे अनेक अपघात वाढले आहेत. संबंधित ट्रॅक्टरचालकावर व कारखानदारांवर कारवाई करण्यासह अनेक मागण्यांसाठी नुकतेच अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृ्त्वाखाली घेरावो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक अधिकार्यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डगळे यांनी निवेदन स्वीकारले. तोपर्यंत अखिल भारतीय छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी परिवहन कार्यालयाच्या पायर्यांवर घेरावो घालत ठाण मांडून होते. संघटनेने वेळोवेळी दिलेल्या निवेदनाची आपण दखल न घेतल्याने तसेच आपण 14 डिसेंबर, 2020 रोजी आपल्या विभागांतर्गत असणार्या साखर कारखान्यांना तुटपुंज्या कारवाईचे पत्र काढून या विषयास फाटा देण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो संघटनेस मान्य नाही. तसेच पत्रामध्ये कोपरगाव सहकारी साखर कारखाना, प्रसाद शुगर, यूटेक शुगर अशा खासगी कारखान्यांसह काही कारखान्यांना नोटीस दिलेली आढळत नाही. आपण केलेली कारवाई ही फक्त कागदोपत्री दिसते. आम्ही आपल्याला फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात पत्र दिले होते. त्या अनुषंगाने कारखाने सुरू होण्याच्या दरम्यानच्या काळात आपण कारखान्यांना पत्र देणे अपेक्षित होते. परंतु ट्रॅक्टरला जोडलेले अनधिकृत बैलगाडी जुगाड आपल्या परवानगीशिवाय चालत असून पूर्णपणे बेकायदेशीर असताना सुद्धा प्रत्यक्ष ट्रॅक्टरमालकावर आणि त्यांचा करार करून घेणार्या कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी आपण तुटपुंजे पत्र काढून कागदी घोडे नाचविण्याचा सरकारी कार्यक्रम राबविला असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
दरम्यान, आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दुधाळ व मेहेर यांनी आंदोलकांना परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर निनादून सोडला. अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, शरद बोंबले, अमोल वाळुंज, रमेश म्हसे, प्रवीण देवकर, नीलेश बानकर, मनोज होन, लक्ष्मण कसबे, विजय बडाख, प्रवीण कांबळे, प्रदीप पटारे, अक्षय बोरुडे, राहुल तारक, अमोल रोकडे, ऋषीकेश राऊत, महेश राऊत, अजिंक्य राऊत, ओंकार सोनुले, अनिल तळोले, सुहास निर्मळ, बाबासाहेब डांगे, दीपक पठाडे, सुरेश कुंजीर, देवेंद्र वीरकर, गोरख शेजूळ, सुभाष कापसे, विजय तेलोरे, जगन्नाथ कापसे, राहुल चिंधे आदी सहभागी होते.