संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाला चोरट्यांचा विळखा! असंख्य समस्यांनी ग्रासले स्थानक; आगारासह आता पोलिसांचेही नियमित दुर्लक्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेले आणि संगमनेरच्या सौंदर्यात भर घालणारे येथील बसस्थानक आता स्थानिक व्यापारी व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरु लागले आहे. मोठ्या जागेत विस्तारलेल्या संगमनेर बसस्थानकात स्वच्छतेपासून ते प्रवाशांच्या सुरक्षेपर्यंत असंख्य तक्रारी वाढल्या असून त्याचे निरसनच होत नसल्याने सुरुवातीला वैभवशाली असं बिरुंद मिरवणार्या या बसस्थानकाची अक्षरशः रया गेली आहे. दिवसाढवळ्या बसस्थानकातून महिलांचे दागिने व प्रवाशांच्या पाकिटांवर डल्ले मारले जात असून केवळ दागिने खरेदी केलेल्या पावत्या नसल्याचे कारण सांगत पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संगमनेर आगाराच्या गलथान कारभारात आता पोलिसांचाही समावेश झाला असून सुरुवातीला वैभवशाली म्हणवणार्या या स्थानकाला आता असंख्य समस्यांनी ग्रासले आहे.

पुणे-नाशिक या महानगरांदरम्यानच्या मार्गावर वसलेल्या संगमनेर बसस्थानकात नेहमीच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि त्यातून प्रवास करणार्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. देशाच्या उत्तरभागातून दक्षिणेकडे जाणार्या राज्यातील मोजक्या महामार्गांमध्ये पुणे-नाशिक महामार्गाचाही समावेश होत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळही असते. त्यामुळे संगमनेरचे महत्त्व दिवसांगणिक वाढत असून तोच धागा धरुन संगमनेरचे लोकप्रतिनिधी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर बसस्थानकाचे नूतनीकरण घडवून आणले होते. बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वाने उभ्या राहीलेल्या या बसस्थानकाच्या परिसरातील पूर्वीची अतिक्रमणं हटवून त्याजागी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले.

या संकुलात व्यापारासाठी गाळे घेणार्यांकडून 20 ते 50 लाखांपर्यंतची अनामत रक्कमही उकळण्यात आली. मात्र त्या बदल्यात व्यापार्यांना ज्या सुविधा देणे आवश्यक होते त्या मात्र देण्यास सुरुवातीपासून टाळाटाळ होत असल्याचे चित्र दिसत होते. आज नाहीतर उद्या यात सुधारणा होईल या भरवशावर लाखो रुपयांची अनामत व हजारो रुपये मासिक भाडे देणारे येथील व्यापारी तग धरुन होते. मात्र ना त्यांना कोणत्या सुविधा मिळाल्या, ना त्यांच्या तक्रारींची कोणी दखल घेतयं अशी सध्याची अवस्था निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणार्या ठेकेदाराने या परिसरातील व्यापारी, ग्राहक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही.

अतिशय विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या संगमनेर बसस्थानकाची स्वच्छता करण्यासाठी आजवर स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखो रुपये मोजूनही व्यापार्यांनाच आपल्या दुकानाच्या परिसराची स्वच्छता करण्याची पाळी आली आहे. सुरुवातीला व्यावसायिक गाळ्यांची विक्री करताना वाहनतळाच्या सुविधेसह व्यापारी संकुलाचे चित्र ठेकेदाराने उभे केल्याने अनेकांनी त्याला भुलून येथे लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आता त्यांना आपल्या या कृत्याचा पश्चाताप करण्याची वेळ आली असून येथील व्यापार्यांशी संबंधित नसलेली वाहने, रिक्षा आणि प्रवाशी वाहनांसह असंख्य फळविक्रेत्यांनी या व्यापारी संकुलाचा परिसर गजबजला आहे. त्याचा फटका येथील व्यापार्यांना बसत असल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

वैभवशाली म्हणवणार्या या बसस्थानकाच्या मुख्यप्रवासी द्वाराने कसरत करीतच फलाटापर्यंत जावे लागते. रस्त्यात असंख्य भिक्षेकर्यांनी आपापले बस्तान बांधले असून गेल्याकाही वर्षांपासून त्यांचा मुक्काम येथे असल्याने या प्रवेशद्वारातील बहुतांशी मोकळी जागा आणि प्रत्यक्ष फलाटांवरील बाकड्यांवर त्यांचे मालकी हक्क निर्माण झाले आहेत. यातील अनेक भिक्षेकरी दिवस-रात्र फलाटांवरील प्रवाशी बाकड्यांवर दिवसभर पहुडलेले असल्याने प्रवाशांनाच बसची प्रतीक्षा करण्यासाठी बाकड्यांची कमतरता भासत आहे. वास्तविक हा सगळा प्रकार आगारप्रमुखांच्या अधिकारात असूनही त्यांच्यात निष्क्रियता भिनल्याने दररोज उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहूनही त्यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने व्यापारी आणि प्रवाशांचा संताप होत आहे.

या गैरकारभारात आता प्रभारीराज असलेल्या पोलिसांचाही समावेश झाला असून बसस्थानकात पोलीस चौकी असूनही येथे कधीही कर्मचारी हजर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सध्या संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाला भिक्षेकर्यांसह चोरट्यांचाही विळखा बसला असून दररोज प्रवाशांचे दागिने, खिशातील पाकिटे व अन्य मौल्यवान चीजवस्तू लांबविण्याच्या घटनांमध्ये एकसारखी वाढ होत आहे. मात्र अशा घटना रोखण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पोलिसांकडून ऐवज चोरीला गेलेल्या प्रवाशांकडून दागिने खरेदी केल्याच्या पावत्यांची मागणी केली जात असून, त्या नसल्यास गुन्हा दाखल करण्याचीही टाळाटाळ होत आहे. गुरुवारी सायंकाळीही असाच प्रकार समोर आला असून नाशिकच्या एका नवदाम्पत्याचे दागिने ओरबाडल्यानंतर केवळ त्यांच्याकडे खरेदीची पावती नसल्याने त्यांची तक्रार दाखल करण्यात आली नाही. माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दूरदृष्टीने संगमनेरच्या विकासात ध्यास घेवून येथील ब्रिटीशकालीन शासकीय इमारतींच्या जागी सुसज्ज अशा कार्यालयांची उभारणी केली खरी, मात्र अशा इमारतींची सुव्यवस्था पाहण्याची जबाबदारी असलेले घटक आपल्याच उद्योगात मश्गुल असल्याने नूतन असेपर्यंत वैभवशाली वाटणार्या या इमारतींच्या सौंदर्यालाच आता ग्रहण लागण्यास सुरुवात झाली आहे.

