आधी नवीन जलसाठा निर्माण करा, मगच पठाराला पाणी द्या! पिंपळगाव खांड लाभधारक शेतकर्‍यांचे मुख्य अभियंत्यांकडे मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील पिंपळगाव खांड लघू बंधार्‍यातून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील 20 गावांना पिण्याचे पाणी देण्यापूर्वी नवीन जलसाठा उपलब्ध करा, मगच पठारभागाला पाणी द्या अशी मागणी पिंपळगाव खांड धरण लाभधारक शेतकर्‍यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक नाशिक विभागाचे मुख्य अभियंता एस. पी. भुजबळ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा अगस्ति साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव पाट, पांगरी, मोग्रस, कोतूळ, भोळेवाडी, पिंपळगाव खांड तसेच खालील भागातील बोरी, वाघापूर, लहित खुर्द, लहित बुद्रुक, लिंगदेव, चास, पिंपळदरी या गावांतील शेतकर्‍यांनी नुकतीच नाशिक विभागाचे मुख्य अभियंता भुजबळ यांना निवेदन दिले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जवळे बाळेश्वर व इतर पठारभागातील गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पिंपळगाव खांड लघू पाटबंधारे तलावातून मंजूर झाली आहे. मात्र पिंपळगाव खांड बंधार्‍यातून पाणी न देता दुसरा उद्भव निर्माण करून पठारभागाला पाणी द्या, अशी जोरदार मागणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी मुख्य अभियंत्याकांडे केली.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा पठारभागातील नळ योजना पिंपळगाव तलावातून न करता पूर्व भागात कोल्हापूर पध्दतीचा नवीन बंधारा बांधून त्यातून पाणी उचलावे. तसेच मुळा नदीच्या पावसाळ्यामध्ये ओव्हर फ्लोच्या पाण्याने नवीन साठवण तलाव तयार करून तिथून पठारभागाला पाणी द्यावे, मुळा परिसरात नवीन दोन-तीन ठिकाणी जलसाठे निर्माण करण्याचा जलसंपदा व जलसंधारण खात्याकडे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्फत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा चालू आहे. तोपर्यंत वरील योजना सुरू करण्याची घाई करू नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली आहे. उन्हाळ्यामध्ये पिंपळगावच्या जलाशयात पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गावांनाच पाणी टंचाई होते. मुख्य अभियंत्यांनी जलसंपदा खात्याबरोबर चर्चा करून संयुक्त बैठक वरीष्ठ पातळीवर करण्याचे मान्य केले. या बैठकीस सीताराम गायकर, पाट पाण्याचे अभ्यासक मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, भाऊसाहेब बराते, शिवाजी वाल्हेकर, सोपान शेळके, भानुदास डोंगरे, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब हाडवळे, संजय साबळे, सदाशिव कानवडे, भाऊपाटील कानवडे, माधव कोरडे, अतुल चौधरी, विठ्ठल साबळे, दत्ताराम साबळे, सुरेश देशमुख, रोहिदास भोर, ज्ञानेश्वर भोर, नारायण थटार, दगडू डोंगरे, लहानू चौधरी आदी लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

पिंपळगाव खांड धरणातून पठारभागासाठी मंजूर झालेली नवीन पाणी योजना सुरू होऊ नये. या मागणीसाठी पिंपळगाव खांड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्यावतीने पिंपळगाव खांड गावात रविवार दिनांक 12 जून, 2022 रोजी सकाळी 9 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
– भाऊसाहेब बराते

Visits: 94 Today: 2 Total: 1101749

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *