खते व इंधन दरवाढीचा शिर्डी शहर राष्ट्रवादीकडून निषेध प्रांताधिकार्यांना निवेदन देत दरवाढ रद्द करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. याचा शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करत सदरची दरवाढ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, अवकाळी पर्जन्य, वादळ यांमुळे शेतकर्यांच्या शेतीमालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणे यासाठी शेतकरी आर्थिक गणित जुळविण्याच्या तयारीस लागले आहे. असे असताना भाजपशासित केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे.
पूर्वी 1185 रुपयांना मिळणारी डीएपीची गोणी आता 1900 रुपयांना झाली असून 10:26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती ती आता 1775 झाली आहे. अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपशासित केंद्र सरकारने 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याबरोबरच आता पेरणीपूर्व मशागती सुरू असून यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते, केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीतही भरमसाठ वाढ केली असल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत.
पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही खते आणि इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करतो. तसेच शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहोचवून ही दरवाढ रद्द करावी. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, महिंद्र शेळके, नीलेश कोते, दीपक गोंदकर, राकेश कोते, अमित शेळके, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, साई कोतकर, अजित जगताप, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आदी उपस्थित होते.