पाणलोटातील पावसाचा जोर मंदावला मात्र विसर्ग कायम! उत्तरनगर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी; जायकवाडीकडे पंधरा हजार क्यूसेकचा प्रवाह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पांडूरंगाच्या दर्शनाने धन्य झालेला बळराजा माघारी परतताच आषाढसरींचा मेळा जमला असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला अपेक्षित असलेला मान्सून परतला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत पश्‍चिम घाटमाथ्यापासून अहिल्यानगरपर्यंत सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून पाणलोटातील मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून निळवंडे धरणातून 13 हजार 650 क्यूसेकचा विसर्ग सोडला जात आहे. मुळा नदीतूनही आठ हजार क्यूसेकहून अधिक वेगाने पाणी वाहत असल्याने मुळाधरणाचा पाणीसाठा 67 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज पहाटेपासून पाणलोटातील पावसाचा जोर कमी झाल्याने भंडारदर्‍याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे, मात्र निळवंडे धरणात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असल्याने सकाळी दहा वाजता विसर्गात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी जुलैतच धरणांमधून विसर्ग सोडावा लागत असल्याने प्रवरा दुथडी झाली असून त्यात आढळा व म्हाळुंगीनदीच्या दोन हजार क्यूसेक पाण्यासह ओझर बंधार्‍यावरुन जायकवाडीच्या दिशेने 14 हजार 675 क्यूसेकचा प्रवाह सुरु आहे.


स्वाती, विशाखा व अनुराधा या तिनही नक्षत्रात मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात धुमाकूळ घालणार्‍या मान्सूनचा जोर ज्येष्ठा नक्षत्रात मात्र काहीअंशी कमी झाला आहे. त्यामुळे मुळा धरणासह भंडारदरा धरणात सुरु असलेली पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग आज सकाळी कमी करण्यात आला असून सध्या धरणातून 6 हजार 70 क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे. कळसूबाईच्या शिखरांवरील पावसाचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे कृष्णवंतीचा प्रवाह मंदावला असला तरीही गेल्या तीन दिवसांतील वाढत्या पावसामुळे भंडारदर्‍यातून सोडलेले पाणी अद्यापही प्रवाहीत असल्याने सकाळी दहा वाजता निळवंडे धरणाचा विसर्ग आणखी वाढवून तो 13 हजार 650 क्यूसेकपर्यंत नेण्यात आला आहे. सद्यस्थिती कायम राहील्यास सायंकाळनंतर त्यात घट होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोटातील पावसालाही वेसन लागले असून कालदुपारनंतर बहुतेक ठिकाणी आषाढपाळ्या सुरु झाल्याने मुळानदीचे पात्र निम्म्यावर आले आहे. सोमवारी सकाळी कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 13 हजार 375 क्यूसेकचा प्रवाह होता, तो आज सकाळी 6 वाजता 8 हजार 28 क्यूसेकपर्यंत खालावला. मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसासह मोसमी पावसानेही जोरदार साथ दिल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मुळाधरण 67 टक्क्यांहून अधिक भरले आहे. बहुतांशवेळा परतीच्या पावसावरच अवलंबून असलेल्या आढळा व भोजापूर धरणांच्या पाणलोटात यावेळी मान्सूनने सुरुवातीच चैतन्य निर्माण केले. त्याचा परिणाम एव्हाना रडतखडत भरणारी ही दोन्ही जलाशयं जून अखेरीसच ओसंडली. त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अकोले तालुक्यातून ऊगम पावणार्‍या सर्व छोट्या-मोठ्या नद्या आणि ओढे वाहते झाले आहेत. सध्या देवठाण धरणातून आढळा नदीत एक हजार 50 क्यूसेक तर, भोजापूरच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात 990 क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे.


अपेक्षेप्रमाणे आषाढी एकादशीनंतर राज्याच्या बहुतांश भागासह जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन होवू लागले आहे. रविवारपर्यंत अकोले, संगमनेरपर्यंत अडकलेल्या मान्सूनच्या ढगांनी सोमवारी जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, राहुरी, कोपरगाव, नेवासा आणि अहिल्यानगर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावताना आपल्या आगमनाची सूचना दिली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधीक 52 मि.मी पावसाची नोंद शिर्डीत झाली. त्या खालोखाल अकोले 39 मि.मी, संगमनेर 24 मि.मी, नेवासा 12 मि.मी, राहाता 11 मि.मी, श्रीरामपूर 10 मि.मी, राहुरी 08 मि.मी, कोपरगाव 07 मि.मी व अहिल्यानगर 05 मि.मी याप्रमाणे पाऊस नोंदवण्यात आला आहे.


अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटातही पावसाने थैमान घातल्याने गंगापूर व दारणा धरण समूहातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी नांदूर मधमेश्‍वरजवळील बंधार्‍यावरुन गोदावरी नदीपात्रात 43 हजार 882 क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटातील जोरदार पावसामुळे या दोन्ही धरणांमधूनही मोठा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी संगमनेर तालुक्यातील ओझर जवळील बंधार्‍यावरुन प्रवरापात्रातून जायकवाडीच्या दिशेने 14 हजार 675 क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होण्यास मदत होणार आहे. गेल्या चोवीस तासांत या महाकाय जलाशयात तीन हजार 790 दशलक्ष घनफूटापेक्षा अधिक पाणी दाखल झाले असून गोदावरी उर्ध्वभागातून आत्तापर्यंत 22 हजार 580 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी धरणात जमा झाले आहे.


गेल्या चोवीस तासांत धरणांच्या पाणलोटात झालेला पाऊस आणि पाणीसाठ्यांची स्थिती पुढीलप्रमाणे : पाऊस – घाटघर 114 मि.मी, रतनवाडी 109 मि.मी, पांजरे 89 मि.मी, भंडारदरा 60 मि.मी, निळवंडे 50 मि.मी, मुळा (धरण) 04 मि.मी, आढळा 19 मि.मी व कोतुळ 15 मि.मी. धरणसाठे – मुळा 17 हजार 469 दशलक्ष घनफूट (67.19 टक्के), भंडारदरा 7 हजार 837 दशलक्ष घनफूट (70.99 टक्के), निळवंडे 7 हजार 43 दशलक्ष घनफूट (67.19 टक्के). सध्या सुरु असलेला विसर्ग : ओझर (प्रवरा) 14 हजार 675 क्यूसेक, भंडारदरा 6 हजार 70 क्यूसेक, निळवंडे 13 हजार 650 क्यूसेक, मुळा (कोतुळ) 8 हजार 28 क्यूसेक, आढळा 1हजार 50 क्यूसेक व म्हाळुंगी 990 क्यूसेक.


समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 103 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के झाल्या शिवाय वरच्या भागातील धरणांमध्ये पाणी साठवता येत नाही. सध्या नांदूर मधमेश्‍वरजवळील गोदापात्रातून 43 हजार 882 क्यूसेक आणि ओझरनजीकच्या प्रवरापात्रातून 14 हजार 675 क्यूसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. आज सकाळी या धरणाचा एकूण पाणीसाठा 69 हजार 987 दशलक्ष घनफूट (68.13 टक्के) झाला असून उपयुक्त पाणीसाठा 43 हजार 920 दशलक्ष घनफूट (57.29 टक्के) इतका आहे. गेल्या चोवीस तासांत गोदावरीपात्रातून 3 हजार 786 दशलक्ष घनफूट नवीन पाणी धरणात दाखल झाले आहे. या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 50 हजार दशलक्ष घनफूट झाल्यानंतर वरील धरणांतून पाणी सोडण्याची गरज नसते. सध्या ही मर्यादा पूर्ण करण्यासाठी सहा हजार दशलक्ष घनफूटाची (सहा टीएमसी) आवश्यकता असून येणार्‍या कालावधीत ती सहज ओलांडली जाण्याची शक्यता आहे.

Visits: 309 Today: 5 Total: 1111978

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *