‘मी पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह’?; नगरच्या तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘मी पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह’?; नगरच्या तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
महापालिकेच्या रॅपिड टेस्टमध्ये ‘पॉझिटीव्ह’ तर जिल्हा रुग्णालयात ‘निगेटीव्ह’ अहवाल
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर महापालिकेने रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्यानंतर एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह देण्यात आला. मात्र, या तरुणाने जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना निगेटीव्ह देण्यात आला. त्यामुळे या तरुणाला मी पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह, असा प्रश्न पडला असून त्याने या संदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या माध्यमातून कोरोना चाचणीमध्ये सुरू असलेल्या घोळावर प्रकाश टाकला आहे. यापूर्वीही जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या संगमनेर तालुक्यातही बेकायदेशीररित्या खासगी कोरोना तपासणी प्रयोगशाळा स्त्राव घेऊन अहवाल देत असल्याचे दैनिक नायकने चव्हाट्यावर आणले होते. यानिमित्ताने पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेतच वेगवेगळे अहवाल येऊ लागल्याने नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या पत्रात या 24 वर्षीय तरुणाने म्हंटले आहे की, अहमदनगर शहर महानगरपालिकेतर्फे जी कोविड 19 अँटीजेन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविडसारख्या गंभीर महामारीचे निदान करते का? याबद्दल शंका आहे. मी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने आयोजित कोविड-19 अँटीजेन तपासणी उपक्रमांतर्गत जुने अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली. तपासणीनंतर दहा मिनिटांतच मला कोविड-19 ची लागण झाल्याचे सांगण्यात आले. मी खूप घाबरून गेलो व टेन्शन आले. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण, तिथे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटीव्ह सांगत होते. मित्राशी चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. अजिबात विलंब न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे स्वॅब दिला. दोन दिवसांनी, 23 ऑगस्टला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट घेतला, त्यात मी निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. 24 ऑगस्टला मी पुन्हा रॅपिड टेस्ट केली, ती पुन्हा पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मी कोरोना पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह? असा प्रश्न मला पडला आहे.


‘रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आल्यानं मी उपचारसाठी जिल्हा रुग्णालय येथे गेलो, तर तिथले डॉक्टर बोलले तुम्ही निगेटीव्ह आहात. तुम्हांला उपचारांची गरज नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी वेगळाच सल्ला दिला. तुम्ही एचआरसीटी करा, हे रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. एचआरसीटी केल्यावर तुम्हांला नेमका काय त्रास आहे ते कळेल. पण माझ्या माहितीनुसार एचआरसीटीमध्ये न्यूमोनियाची लक्षणे कळून येतात,’ असं या तरुणानं पत्रात म्हटलं आहे. कोरोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी. मी स्वतः आता गोंधळून गेलेलो आहे की मी पॉझिटीव्ह आहे की निगेटिव्ह? या सर्व निगेटीव्ह, पॉझिटीव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल, असंही या तरुणानं पत्रात नमूद केलं आहे.


या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्याचा बाधितांचा फुगणारा आकडा सत्य की असत्य असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. त्यात या संकटात संधीचे सोने करुन वैद्यकीय क्षेत्रातील मतलबी खिसे भरण्याचे काम करत आहे. परंतु संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावणार्‍या कोरोना योद्ध्यांबरोबर आपले साहसी कार्य दाखविण्याऐवजी दृष्कृत्य करत असल्याने कोरोनाचा लढा यशस्वी करणे ‘त्या’ मतलबींमुळे अवघड होईल.

Visits: 10 Today: 1 Total: 117158

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *