थोरात कारखान्यात उच्चांकी अल्कोहोल उत्पादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आपल्या गुणवत्तेबरोबरच उपपदार्थ निर्मितीतील डिस्टिलरी प्रकल्पातून एका दिवसात विक्रमी 58 हजार 300 लिटरचे उच्चांकी अल्कोहोल उत्पादन करून कारखान्याच्या कार्यक्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने नवीन 5 हजार 500 मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व तीस मेगावॅट वीज प्रकल्प निर्मिती उभा केला आहे. विनाअडथळा कार्यान्वित झालेला हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती म्हणून या कारखान्याने 1984 मध्ये डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली. 40 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अल्कोहोल प्रकल्पाचे सन 2019 मध्ये मॉडर्नायझेशन करून मल्टीप्रेशर कॉपर कॉलमसह 40 हजार लिटरचा प्रकल्प सुरु केलेला आहे. या प्रकल्पामधून 58 हजार 300 लिटरचे एका दिवसात उच्चांकी अल्कोहोल उत्पादन कारखान्याने घेतले आहे. कारखान्याने चालू हंगामात आत्तापर्यंत 3 लाख 57 हजार 500 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून वीज प्रकल्पातून आत्तापर्यंत 1 कोटी 86 लाख 17 हजार 400 वीज यूनिट निर्यात करून 12 कोटी 85 लाखांचे उत्पादन मिळवले आहे. चालू हंगामात या कारखान्याने 49 दिवसात चांगले उत्पादन व वीज निर्मिती केली आहे. कारखान्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दद्दल कारखान्याचे मार्गदर्शक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांसह विभागप्रमुख, सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

