शिवसेना – भाजप पदाधिकार्यांत माघारीमुळे जुंपली पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला; आघाडीतही बिघाडी
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायत निवडणुकीत सोवमारी (ता.13) माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 प्रभागांमधून 16 अर्ज उमेदवारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेतल्याने, 44 अर्ज शिल्लक राहिले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय कासे, सहायक निवडणूक अधिकारी विक्रम जगदाळे यांनी दिली. मात्र, माघारीच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना शांत केले.
अकोले नगरपंचायतीत सोमवारी माघारीचा दिवस होता. सकाळी 11 वाजता एक नाट्य घडले. भाजपकडून उभ्या असलेल्या माळीझाप येथील प्रभाग क्रमांक एकच्या महिला उमेदवार शोभा मच्छिंद्र मंडलिक अर्ज माघारीसाठी तहसील कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हापासून त्या गायब झाल्याने भाजप कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. त्यामुळे या प्रभागातील काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. एकूण 16 जणांनी अर्ज मागे घेतले. मात्र, यात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांची युती असली, तरी काँग्रेसने आपली भूमिका स्वतंत्र लढण्याची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे 13 पैकी 10 राष्ट्रवादी व 3 प्रभागांत शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले. एबी फॉर्म घेतलेल्या दोन उमेदवारांनी माघारीची मुदत संपूनही माघार न घेतल्याने, आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले.
आपण उमेदवारी मागे घेणार नाही, असे सांगत असताना माजी आमदार वैभव पिचड, कैलास वाकचौरे, शिवाजी धुमाळ, रावसाहेब वाळुंज यांनी धुमाळ यांना घेरले. माघारीची बळजबरी का करता, असा जाब विचारत पोलिसांचे लक्ष याकडे वेधले. त्यावेळी संबंधित महिला उमेदवार व तिचा पती तहसीलदार कार्यालयातून बाहेर पडले. कार्यकर्ते त्यांच्या मागे गेले. मात्र, त्यावेळी माघारीची मुदत संपली. 16 प्रभागांतील शिवसेनेचा उमेदवारी अर्ज तसाच राहिला. माळीझाप प्रभाग क्रमांक एकमधील महिला उमेदवार शोभा मंडलिक यांच्यावर दबाव आणल्याबाबत अकोले पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी मच्छिंद्र मंडलिक गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ती दाखल झाली नव्हती.