महिला पोलीस मित्र संघाची संगमनेरात स्थापना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना करणार मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणून सामाजिक जनजागृती आणि निर्भया भयमुक्त अभियानांतर्गत पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संचलित महिला पोलीस मित्र संघाची संगमनेर येथे नुकतीच शाखा स्थापन करण्यात आली आहे.

संघाच्या स्थापनेनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संघाच्या अध्यक्षा छाया ढगे म्हणाल्या, आक्रमक न होता समुपदेशनातून गुन्हेगारी थांबविता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. अन्याय-अत्याचाराविषयी प्रचंड चीड असून आलेले अनुभव फार विचित्र आहेत. त्यास महिला पोलीस मित्र संघातून वाचा फोडू. तर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने म्हणाले, सामाजिक भान व प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले तर गुन्हेगारीच फोफावणार नाही. या कामासाठी हवे त्या सहकार्यासह महिलांच्या पाठीशी खंबीरपणे पणे उभे राहू. तत्पूर्वी पोलीस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांच्या हस्ते महिलांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रातील पोलीस मित्र मोठ्या संख्येने गणपती उत्सव, मोहरम बंदोबस्त, निवडणुकीमध्ये मदत कार्य, वाहतूक दळणवळण अशा स्वरुपातून पोलीस यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य, सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारी या उद्देशाने मदत करत आलेले आहेत. तसेच ‘जाणीव झाली बदल घडवूया’ या संकल्प योजनेतून स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील उपक्रम, महिला, युवक-युवतींसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळा, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन आदिंबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि पर्यावरणातले विविध प्रकल्प पोलीस मित्र संघ संस्थेच्यावतीने राबविले जातात. संस्थेला विशेष मार्गदर्शन म्हणून लाभलेले माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची पोलीस मित्र संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.

तर वरीष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया पथकाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे कायद्याच्या संरक्षणामुळे महिला व युवती निर्भीडपणे समाजात वागताना दिसत आहेत. हा निर्भया व भयमुक्त वारसा शाळा व महाविद्यालये अशा ठिकाणी पोलीस मित्र संघाच्यावतीने उपक्रमाद्वारे राबविला जातो. या कार्यक्रमास अध्यक्ष जगन्नाथ ढोमसे, उपाध्यक्ष बाबासाब काटे, प्रा.उल्हास पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्षा मनीषा ढवळे, हवेली तालुका शाखाध्यक्षा नीलम गव्हाणे, केसनंद शाखाध्यक्षा शोभा हरगुडे, प्रा.जिजाबा हासे, माया गोसावी, सविता गुंजाळ, राधा चव्हाण, शहिदा शेख, शैला गुंजाळ, कमल अरगडे, जया कोदे, भारती कासार, रुपाली काळे, सुवर्णा मुंगसे, लता जाधव, उषा अभंग, दीपाली गुंजाळ, वंदना रहाणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *