निमगाव खैरीमध्ये पित्यानेच केला चिमुरडीवर अत्याचार
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील निमगाव खैरी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहावर्षीय चिमुरडीवर पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात वडीलांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील निमगाव खैरी परिसरात एका पोल्ट्रीफार्मवर काम करीत असलेल्या परप्रांतीय कुटुंबात हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी (ता.19) सायंकाळी सात वाजता पोल्ट्रीफार्म समोरील घरामध्ये 27 वर्षीय पित्याने स्वत:च्या दहावर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चिमुकलीच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयिताला तातडीने अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी येथील न्यायालयात संशयित आरोपीला हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पुढील तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहे.