कोपरगावकरांना पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा… असा किती दिवस पाणी पुरवठा करणार, संतप्त महिलांचा सवाल
अक्षय काळे, कोपरगाव
कोपरगावकरांना सध्या 4 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु, ते देखील मैलामिश्रीत करुन किती दिवस असा पाणी पुरवठा करणार असा संतप्त सवाल महिला विचारत आहे. तसेच पालिका प्रशासन व पदाधिकार्यांच्या उदासीन कारभाराविरोधात बोटे मोडीत असल्याचे दृश्य प्रत्येक गल्लीबोळात दिसून येत आहे.
कोपरगाव शहरात 1971 पूर्वी स्व.वसंत सातभाई यांच्या सातभाई वॉटर अँड इलेक्ट्रिक कंपनी मार्फत दोनवेळा किमान एक ते दोन तासाच्या वेळात सर्वोच्च दाबाने पाणी मिळत होते. परंतु हे गोदापात्रातील विहिरीतून उचलले जात असे. गोदापात्रापासून पाच किलोमीटर परिसरात पाण्यातील क्षारांचे प्रमाण सर्वोच्च असल्याने येथील नागरिकांच्या नशिबी खारे पाणी पिण्याचे वेळ येत असल्याने नागरिकांनी आंदोलने केल्यावर गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. यानंतर किमान चारवेळा विस्तारित पाणी पुरवठा योजना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी राबविल्या. परंतु विविध कारणांमुळे व दोन्ही गटातील राजकीय खेळीतून कोपरगावकरांना कधीच पाणी मिळाले नाही. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दिवसेंदिवस दारणा व गंगापूर धरणाचे गोदावरी डाव्या कालव्यातून मिळणार्या पाण्यात कायम विक्रमी घट होत आहे. तर गोदावरी डाव्या कालव्याने आपली शंभरी केव्हाच पूर्ण केल्यावर या कालव्याच्या दुरूस्तीबाबत राज्य शासन कायम उदासीन राहिले आहे.
तर नगरपालिकेच्या चारही साठवण तलावामध्ये गाळ साठणे व पाणी गळतीमुळे दहा दिवसांचा सुद्धा पाणी पुरवठा करताना कायम कायम त्रेधातिरपीट उडते. त्यात पाटबंधारे खात्याने पालिकेला 100 दिवसांकरिता साठवण तलाव उभारावा याची सक्ती केली. परंतु पालिकेला हे शक्य होत नाही. गोदावरी डाव्या कालव्याचे दोन पाणी आर्वतनातील (पाणी सोडण्याचा) कालावधी दोन ते सहा महिन्यांपर्यंत वाढविला. यामुळे जनतेला पाणी पुरेशा प्रमाणात देणे अशक्य झाले आहे. याबाबत आत्तापर्यंत दोन्ही गटांचे एकमेकांचे पाय ओढण्याच्या स्पर्धेमुळे पाणी पुरवठा कामकाजात अनेक अडथळे निर्माण केले आहे. यात बिपीन कोल्हे यांनी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या मदतीने सन 2030 पर्यंत पाणी पुरविणारी विस्तारीत योजना केंद्र शासनामार्फत आणली. परंतु पालिकेत सत्तातरानंतर हे काम बंद पडले. हे एक गुढच आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरणातून थेट बंद जलवाहिनीतून एक पैसा खर्च करावा लागणार नाही अशी योजना मंजूर घेतली. परंतु निविदा काढल्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्या योजनेची वाट लावताना गोदावरी-नांदूर मधमेश्वर धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी योजनेचा डांगोरा पिटविण्यात धन्यता मानली जात आहे. धरणातून नाशिक शहर व धरणाच्या वरील गावांचे मैला व गटारमिश्रीत पाणी कोपरगावकरांना किती दिवस पुरविले जाणार असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत.