अहमदनगर जिल्ह्यात ‘वाझे’ संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न! जे ठाकरेंच्या राज्यात, तेच फडणवीसांच्या काळात; मलाईदार प्रकरणात ‘नगरी’ चबढव वाढली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी मुंबईतील टोळीयुद्धावर नियंत्रण मिळवताना गुन्हेगारी जगतावर जरब निर्माण करणार्या मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे या दुय्यम पोलीस अधिकार्याने ‘महाविकास’ आघाडी सरकारच्या काळात राबविलेला कथित ‘वसुली’ फंडा आजही चवीने चर्चीला जातो. राज्यातील सत्ता बदलानंतर ‘सुपर कमिश्नर’ म्हणून वावरणार्या या अधिकार्याला गजाआडही घालण्यात आले. मात्र त्याने निर्माण केलेले ‘वसुली’चे तंत्र आता अहमदनगर जिल्ह्यात रुजविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. यासाठी ‘नगरी’ नियंत्रणात असलेली तपास संस्था सध्या जिल्ह्यातील सगळ्याच मलाईदार प्रकरणात ‘चबढव’ करीत असून प्रत्येक प्रकरणात सुखसंपन्न व्यक्तीचा ‘स्पर्श’ शोधून त्यांना लक्ष्य केले जात आहे. एकट्या संगमनेरातच अशा एकामागून एक घटना समोर येत असून दोनच दिवसांपूर्वी नाशिकरोडवरील एका धनाढ्य व्यापार्याच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणात मोठा ‘बकरा’ कापला गेला आहे. काही दिवसांपूर्वी याच यंत्रणेने शहरातील काही सुवर्णकारांची झाडाझडती घेत जवळपास किलोभर सोने नेल्याची चर्चा अजूनही संगमनेरच्या बाजारपेठेत सुरु आहे. यावरुन अहमदनगर जिल्ह्यात नवा सचिन वाझे जन्माला आल्याचे दिसत असून जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राज्यात घडले, त्याचीच पुनरावृत्ती आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात होत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा भौगोलिक पसारा खूप मोठा आहे. दोन खासदार आणि चौदा आमदारांचा समावेश असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्याही ६० लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकूण ३० पोलीस ठाणी व दोन विस्तारीत कक्ष असून त्याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात काम करणार्या स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेल, आर्थिक शाखा, भरोसा सेल अशा वेगवेगळ्या विभागांकडून जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था सांभाळली जाते. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, नाशिक, पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमांना खेटणार्या अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचाही मोठा सुकाळ आहे. त्यांच्याकडून होणार्या कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यात तीस पोलीस ठाणी आणि दोन विस्तारीक कक्ष कार्यान्वित आहेत.
मात्र अपवादात्मक प्रकारणात एखादा गंभीर गुन्हा घडल्यास अथवा एखाद्या गुन्ह्यातील आरोपींची व्याप्ती अधिक असल्यास अशा प्रकरणात ‘नगरी’ नियंत्रणात असलेल्या ‘त्या’ तपास संस्थेलाही वरीष्ठांच्या आदेशाने तपासात सहभागी केले जाते. आजवर जिल्हा पोलीस दलात अशाच पद्धतीने कामकाज करण्याचा प्रघात होता. मात्र या शाखेत आता मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्यानंतर ‘**भाऊ’ नावाने गुन्हेगारांसह पोलिसांमध्येही दबदबा असलेल्या ‘सायबर’मधील एका पोलीस नाईकाने या संपूर्ण यंत्रणेवरच वर्चस्व निर्माण केले असून त्याने मुंबई पोलीस दलातील ‘सचिन वाझे’ या दुय्यम अधिकारी असूनही ‘सुपर कमिश्नर’ बनलेल्या वसुली अधिकार्याच्या पावलावर पाऊल ठेवतांना ‘वसुली’चे नवे तंत्र विकसित केल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरु आहे.
गणेश विसर्जनाच्या दिनी या वसुली तंत्राचा संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदा वापर करण्यात आला. त्यावेळी सुकेवाडीतील एका खून प्रकरणाच्या तपासातील धागेदोरे संगमनेरपर्यंत आले होते. या प्रकरणात खून झालेल्या व्यक्तिच्या हत्येमागे त्याच्याच कुटुंबाचे निश्चित कारण असतानाही ‘नगरी’ यंत्रणेने तपासाची व्याप्ती वाढवून खुनाच्या घटनेपूर्वी मयताच्या नातेवाईकांनी राजापूरमधील एका डॉक्टरकडून लिहून घेतलेली प्रिस्क्रिप्शन (औषधाची चिठ्ठी) व त्यावरुन त्या डॉक्टरसह त्याच्या दवाखान्या जवळच्या औषध दुकानदाराला गुन्ह्याच्या कक्षेत घेण्याचा ‘धाक’ दाखवत लाखोंची कमाई केली होती. तेथून सुरु झालेला हा प्रकार दिवसेंदिवस जिल्ह्यात फोफावू लागला असून खून, दरोडे, चोर्या या सारख्या प्रकरणात आरोपींनी केवळ ओळख म्हणून संपर्क केलेल्या व्यक्तिंनाही गुन्ह्याची भीती दाखवून नागविले जात आहे.
गेल्याच आठवड्यात चोरीच्या तपासात थेट संगमनेरातील सराफा बाजारात पोहोचलेल्या याच नगरी यंत्रणेने शहरातील चार बड्या सुवर्णकारांना लक्ष्य करीत त्यांच्याकडून चोरीचे विकत घेतलेले तब्बल एक किलोहून अधिक सोने ‘वसूल’ करुन नेल्याची जोरदार चर्चा अद्यापही संगमनेरच्या बाजारपेठेत सुरु आहे. या घटनेच्या दुसर्याच दिवशी पठारावरील एका वाईन शॉपवरही अशाचप्रकारे एकामागून एक गुन्हेगारांना समोर आणण्यात आले आणि त्यातून मोठे घबाड मिळवल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या घटना इतक्या पद्धतशीरपणे राबविल्या जात असून त्यातून ‘**भाऊ’चे परफेक्ट वसुली नियोजन आता हळूहळू समोर येवू लागले आहे. या सगळ्या गोष्टींची वाच्यता होवू नये याचीही ‘भाऊ’ने विशेष दक्षता घेतली असून जिल्ह्यातील अनेकांच्या लेखण्यांमधील ‘शाई’ काढून घेण्यात आली आहे.
या सर्व घटनांमधून नगरी यंत्रणा जिल्ह्यात घडणार्या प्रत्येक प्रकरणावर बारकाईने नजर ठेवून त्यातील ‘मलाईदार’ प्रकरणं आपल्या हाती घेत त्यात सुखसंपन्न कुटुंबातील व्यक्तिंचा ‘स्पर्श’ शोधला जात आहे. दोनच दिवसांपूर्वी संगमनेरात पुन्हा असाच प्रकार घडला असून काही महिन्यांपूर्वी सह्याद्री विद्यालयाजवळील एका व्यापार्याच्या घरात झालेल्या धाडशी चोरीच्या मोठ्या प्रकरणात तालुक्यातील एकाला ‘धाकात’ घेवून त्याच्याकडून साडेआठ लाखांची रक्कम उकळली गेल्याची चर्चा सुरु आहे. याशिवाय जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळावरही याच यंत्रणेने आपला ‘धाक’ बसवला असून दर महिन्याला या यंत्रणेकडून निश्चित झालेला ‘वतनदार’ यंत्रणेचा हिस्सा गोळा करुन ‘भाऊ’पर्यंत पोहोचवत आहे. यासर्व प्रकारांमधून जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना वाढत असून तपास लागलेल्या प्रकरणातील मुद्देमालही आता ‘गायब’ केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतील सचिन वाझेनंतर आता जिल्ह्यात ‘**भाऊ’चा उदय झाला असून ‘वाझे संस्कृती’ रुजविली जात असल्याचे भयान चित्र निर्माण होवू पहात आहे.