नरेंद्र महाराजांच्या पादुका दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी ट्रस्टच्यावतीने 13 गोरगरीब कुटुंबांना घरघंटीचेही केले वाटप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर आणि तालुक्यातील नरेंद्रचार्य भक्त मंडळाच्यावतीने श्री क्षेत्र नाणिज येथून आलेल्या नरेंद्र महाराजांच्या पादुकांची ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नरेंद्र महाराजांचा जयजयकार करत शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकभक्तांनी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी नाणिजधाम येथील स्वामी नरेंद्र महाराज देवस्थान ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 13 गोरगरीब कुटुंबांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.

संगमनेर शहराच्या इंदिरानगर भागातील म्हसोबा मंदिरापासून ढोलताशाच्या गजरात सनई चौघड्याच्या स्वरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. सजविलेल्या पालखीमध्ये नरेंद्र महाराजांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच या मिरवणुकीमध्ये भगव्या आणि हिरव्या साड्या परिधान केलेल्या तुळशी वृंदावन, कलशधारी महिला आणि भगवे ध्वज हातात घेऊन पुरुष भक्तमंडळ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. पायी हळूहळू चला मुखाने नरेंद्र महाराज बोला, बोलो नरेंद्र महाराज की जय असा स्वामींचा जय जयकार करत हजारो भाविक भक्त तल्लीन झाले होते. त्यानंतर ही मिरवणूक इंदिरानगर, नवीन अकोले रोड, बसस्थानक नाशिक रोड व शिवाजीनगर मार्गे जाणता राजा मैदानावर आली.

फुलांनी महाराजांच्या पादुका स्थळाची सजावट करण्यात आली होती. तसेच व्यासपीठावर फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढण्यात आली होती. महिला भक्तमंडळांनी पाद्यपूजन केले. तसेच महाराजांच्या पादुका घेऊन येणार्‍या गुरुचे व पादुकांचे पाद्यपूजन करून औक्षण केले. महाराजांची महाआरती होवून पादुका दर्शनास मोठी गर्दी झाली. तृप्ती महाराज चव्हाण यांचे प्रवचन झाले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, गगनगिरी आश्रमाचे विश्वस्त दिलीप शिंदे, एस. आर. थोरात दूध उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब थोरात, बापूसाहेब देशमुख, नवनाथ अरगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, अमोल खताळ, दीपक शेवाळे, राहुल भोईर आदिंनी दर्शन घेतले. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *