प्रेम प्रकरणातून श्रीरामपूरमध्ये गोळीबार, एक जखमी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील सूतगिरणी परिसरात सोमवारी (ता. 26) रात्री प्रेम प्रकरणातून एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात शुभम जावळकर हा तरुण किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी व त्याचा साथीदार पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी नुकतेच चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले.

शुभम हा खासगी वाहनावर चालक आहे. सोमवारी रात्री तो शेवगाव येथील भाडे घेऊन शहरात आला. मालकाने त्याला त्याच्या घराच्या परिसरात सोडले. तो घरी जात असताना, शुभम यादव याने आणखी एका साथीदारासह दुचाकीवर येऊन गोळी झाडली. त्यात शुभमला किरकोळ दुखापत झाली. शुभमच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शुभम यादव व त्याच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शहरात शोध घेऊन यादवला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.
