चांदेकसारे शिवारात क्रुझरची ऊस वाहतूक बैलगाडीला धडक एका महिलेसह बैल गंभीर जखमी; अपघातानंतर चालक पसार
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडीच्या जवळ एका भरधाव क्रुझर जीप गाडीने कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला गुरुवारी (ता. ३०) सकाळी जोराची धडक दिली. त्यात ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर क्रुझरचा चालक तेथून पसार झाल्याची माहिती ऊसतोड कामगार सुपडू बाबू जाधव यांनी दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच १६० चे चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून अद्याप बाजूचा पालखी मार्ग देखील अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. या महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अतिशय भरधाव वेगाने वाहने या रस्त्यावरुन धावत असतात. परंतु दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी नसल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडते. त्यामुळे अनेक वेळेस अपघात होतात. तसेच झगडे फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकमेकांना छेदून जात असल्यामुळे तेथेही वाहनधारकांची अनेकदा धांदल उडते. त्यातच काही नागरिक जवळचा रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दरम्यान, चार दिवसांत हा दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात सुपडू बाबू जाधव (वय ४०) व त्यांची पत्नी रणजूबाई सुपडू जाधव (वय ३५, मूळ रा. शिवापूर, ता. चाळीसगाव) हे आपल्या बैलगाडीवर चांदेकसारे शिवारात ऊस तोडणीसाठी गुरुवारी सकाळी जात असताना सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पाठीमागून शिर्डीकडे जाणारी क्रुझर गाडीने धडक दिल्यामुळे महिला रणजूबाई व एक बैल गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. ही घटना घडली, तेव्हा गौतम बँकेचे संचालक शरद होन तेथून सकाळी फिरायला जात असताना त्यांनी तातडीने काळे कारखान्याचे शेतकी अधिकारी कैलास कापसे यांना संपर्क करून घटनेची कल्पना दिली. त्यांनी आपले सहकारी उद्धव होन यांच्यासह घटनास्थळी येऊन जखमींना येथील एका दवाखान्यात प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. यावेळी परशराम खरात यांच्यासह ग्रामस्थांनी जखमींना मदत केली.