अवघ्या अडीच लाख रुपयांत झाला रेखा जरेंचा खून! पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उलगडला खुनाच्या गुन्ह्याचा घटनाक्रम

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्‍या नगरच्या रेखा जरे हत्याकांडातील पाच आरोपींना अटक होण्यासह सदरचा खून ‘सुपारी’ घेवूनच घडवून आणला गेल्याचेही पोलीस तपासातून समोर आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड ठरविण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे अद्यापही पोलिसांपासून दूर असल्याने खूनामागील नेमके कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. मात्र प्रत्यक्ष खून करणार्‍यासह पाच जणांच्या चौकशीतून या घटनेला कशा पद्धतीने अंतिम स्वरुप देण्यात आले याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यातूनच हा प्रकार ‘सुपारी मर्डर’ असल्याचेही ठळकपणे समोर झाले आहे. घटनेनंतर अवघ्या पंधरा तासांतच पहिली अटक करणार्‍या गुन्हे शाखेचे जिल्ह्यातून कौतुकही होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.30) रात्री आठच्या सुमारास सुप्याजवळ हे हत्याकांड झाल्यानंतर त्यातील एक संशयित आरोपी जरे यांच्या कारजवळच उभा होता. या घटनेने भेदरुन गेलेल्या रेखा जरे यांच्या मुलाने याही स्थितीत आपल्या मोबाईलवरुन कारसमोर उभ्या असलेल्या ‘त्या’ आरोपीचा फोटो काढला आणि पोलिसांपर्यंत पोहोचवला. पोलिसांनीही समाज माध्यमातून तो प्रचंड व्हायरल केल्याने त्याचे कंप थेट श्रीरामपूरमध्ये जाणवले. त्याच दरम्यान जरे यांच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा दोन्ही बाजूनेही समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेला नेमकी माहिती मिळाली आणि घटनेच्या दुसर्‍याच दिवशी श्रीरामपूरातील एका सलूनच्या दुकानात आपले केस कापून ओळख लपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फिरोज शेखच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

यावेळी जागेवरच केलेल्या चौकशीतून या घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेला गुड्डू शेखही काही वेळापूर्वीच याच सलूनच्या दुकानातून केस कापून गेल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर गेले आणि काही वेळातच प्रत्यक्ष खून करणारे दोघेही पोलिसांच्या हाती लागले. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात नेवून त्यांना पोलीसी हिसका दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि त्यातून आदित्य चोळके या तिसर्‍या आरोपीचे नाव समोर आले. त्यावरुन हा प्रकार सुपारी खुनाचा असल्याचा अंदाजही पोलिसांना आला.

आदित्य चोळकेचे लोकेशन मिळविले असता तो वडझीरे (ता.पारनेर) येथून राहुरीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांनी काढली आणि त्यालाही राहुरीजवळ ताब्यात घेतले. राहुरी पोलीस ठाण्यात नेवून त्याची चौकशी केली असता त्याने अवघ्या अडीच लाख रुपयांच्या सुपारीतून सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा जीव घेतल्याची कबुली दिली, मात्र त्याचवेळी आपल्याला ही सुपारी केडगावमधील सागर भिंगारदिवे याने दिल्याचे सांगीतले. त्यानुसार त्याचे घटनेच्या दिवसापासूनचे लोकेशन मिळविले असता तो घटनेच्यावेळी केडगाव-सुपा तर त्यानंतर थेट तळकोकण आणि नंतर पन्हाळा (जि.कोल्हापूर) असे मिळाले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले आणि अखेर सुरुवातीचा मास्टरमाईंड म्हणून समोर आलेला सागर भिंगारदिवे गुन्हे शाखेच्या हाती सापडला.

मात्र चौकशी करुन, पोलिसी खाक्या दाखवूनही भिंगारदिवे काही तोंड उघडायला तयार होईना. पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आपणच आदित्य चोळकेला अडीच लाख रुपये देवून रेखा जरेंचा खून करण्यास सांगितले होते, मात्र कशासाठी? या प्रश्नावर मात्र त्याची पुन्हा दातखिळी बसली. पोलिसांनीही त्याला बोलते करण्याचा चंग बांधून विविध प्रयोग केल्यानंतर त्याने ‘तो खुप मोठा माणूस आहे, मला तो जीवंत सोडणार नाही’ असे म्हणत पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. मात्र पोलिसांनी ‘तुला काहीच होवू देणार नाही’ असा विश्वास भरुन त्याला बोलते केले आणि त्याने या हत्याकांडामागे असलेले ‘ते’ नाव सांगून टाकले. ते ऐकून पोलिसही काहीवेळ अवाक् झाले होते.


ही धक्कादायक माहिती नगरमध्ये वरीष्ठांना मिळाल्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या ‘त्या’ मोठ्या नावाच्या व्यक्तिचे मोबाईल डिटेल्स काढण्यात आले. त्यावरुन ‘ती’ व्यक्ती ज्या ज्यावेळी भिंगारदिवेशी संपर्क करीत त्याच्या आधी त्याचा रेखा जरेंशी संपर्क होत असल्याचे दिसून आले. भिंगारदिवेशी ‘त्या’ मोठ्या माणसाचा संवाद झाला की लागलीच तो आदित्य चोळकेशी बोलत असल्याचे आणि नंतर चोळके शेख व शिंदे यांच्याशी संपर्कात येत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष हत्याकांड घडले त्या दिवशी ‘तो’ मोठा माणूस नगरच्या सावेडी परिसरात, भिंगारदिवे टिळकनगर केडागाव, चोळके वडझरी (पारनेर) परिसरात होते. तर प्रत्यक्ष खून करणारे शेख व शिंदे या दोघांचे लोकेशन नगरहून पुणे रोड, तेथून शिरुर आणि नंतर शिरुरहून पुन्हा नगरच्या दिशेने असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार ज्यावेळी हे दोन्ही मारेकरी शिरुरमध्ये पोहोचले त्यावेळी मयत रेखा जरेंच्या मोबाईलचे लोकेशनही शिरुरच होते.

त्यानंतर ठराविक अंतराने जरे यांच्या मोबाईल लोकेशसह त्या दोघा मारेकर्‍यांचे लोकेशनही एकामागोमाग असल्याचे आढळले. सुपा टोलनाक्यापर्यंत हो खेळ सुरु होता. त्यानंतर जरे यांच्या मोबाईलचे लोकेशन नगरच्या सिव्हील हॉस्पिटल तर त्या दोघांचे लोकेशन पुन्हा शिरुरच्या दिशेने असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून नाव आलेल्या ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांचे जरेंशी बोलणेही झाले होते, त्यावेळी त्या शिरुरमध्ये होत्या. सदरची माहिती त्यांनी लागलीच भिंगारदिवे याला, भिंगारदिवेने चोळकेला आणि चाळकेने शेख व शिंदे यांना दिली. या फोननंतर बोठे यांचा एकही फोन जरे यांना झाला नाही.

रेखा जरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यासोबतच असणार्‍या त्यांच्या सखी रत्नमाला माने यांनी बोठे यांना फोन करुन घटनेची माहिती दिली हे विशेष. त्यावर बोठे यांनी काय घडले? कसे घडले? लागलीच नगरकडे निघा असे म्हणत सुप्यातील आपल्या सहकार्‍यांकरवी रुग्णवाहिकाही पाठवली व त्यांना सिव्हीलपर्यंत आणले. त्यानंतर रुग्णालयातील उपचारांपासून ते रेखा जरे यांचा अंत्यविधी होईस्तोवर बोठे यांनी जरे यांच्या आई, दोन्ही मुले व सून यांचे सांत्त्वन देण्याचीही भूमिका बजावली. मात्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या टीमने केवळ पाणी पिवून वेळ मारीत एक एक करुन सगळे आरोपी समोर आणले आणि माणूस नव्हे या देशात कायदाच सगळ्यात मोठा असल्याचे दाखवून दिले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक विलास ढुमे व अजित पाटील या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक निरीक्षक शिशीर देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी घटना घडल्यापासून अहोरात्र गुन्हेगारांच्या मागे धावत अवघ्या अठरा तासांतच मारेकर्‍यांसह पाचही आरोपींना अटक केली आणि अन्नाचा एक घासही न खाता सलग अठरा तास सुरु असलेल्या या तपासातून पोलिसाीं अवघ्या राज्यातील वृत्तपत्र क्षेत्राला धक्का देणारे वृत्त समोर आणले. पोलिसांनी केलेला जलद तपास आणि कोणताही दबाव झुगारुन सर्व आरोपी उघड करण्याच्या कृतीचे जिल्ह्यातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Visits: 120 Today: 2 Total: 1098403

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *