शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी संगमनेरात काँग्रेसचे धरणे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने विनाचर्चेने लादलेले जुलमी कृषी विधेयक व कामगार विधेयक हे अत्यंत जाचक असून हे तातडीने रद्द करावे. या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात तालुका काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला.

संगमनेरातील बसस्थानकासमोर नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका काँग्रेस समिती व शहर काँग्रेस समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन झाले. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेच्या समिती सभापती मीरा शेटे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, संतोष हासे, हिरालाल पगडाल, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, सुभाष सांगळे, गणपत सांगळे, कैलास पानसरे, निर्मला गुंजाळ, उबेद शेख, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, प्रा.बाबा खरात, माणिक यादव, आनंद वर्पे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, विलास कवडे, विलास वर्पे, शिवाजी खुळे, सौदामिनी कान्होरे आदिंसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने विनाचर्चेने देशामध्ये लागू केलेले कृषी व कामगार विधेयके अत्यंत जाचक व सर्वसामान्यांच्या विरोधी आहे. या काळ्या कायद्यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये तीव्र भूमिका घेतली असून देशभरातील शेतकर्यांमध्ये केंद्राने लादलेल्या या कायद्याविरोधात संतापाची लाट आहे. यासाठी हरियाणा व पंजाबमध्ये शेतकर्यांनी मागील तीन महिन्यांपासून या कायद्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले असून आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी एकवटले आहेत. या शेतकर्यांची सन्मानाने चर्चा करण्याऐवजी भारत सरकार हुकूमशाही पद्धतीने त्यांच्यावर अश्रुधूर, नळकांडे व लाठीचार्ज करत आहे, त्याचे हे काम निंदनीय आहे. जगाच्या पोशिंद्यालाही अपमानास्पद वागणूक दिली जात असून ही लोकशाहीची थट्टा आहे. म्हणून केंद्र सरकारने लागू केलेले काळे कायदे तातडीने रद्द करावेत व दिल्लीतील शेतकर्यांचा सन्मान करावा या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. शेवटी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.

