… अखेर शरीरापासून वेगळे झालेले डोके अथक प्रयत्नांनंतर सापडले! पिंपळगाव निपाणी येथे शेतकर्याने विहिरात गळफास घेऊन केली आत्महत्या
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकर्याने विहिरीत गळफास घेतला. गळफास घेताना दोरीने मुंडके (डोके) बाजूला आणि गळ्यापासून पायापर्यंतचे शरीर दुसर्या बाजूला झाले, अशी विचित्र घटना रविवारी (ता.17) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. मात्र, शवविच्छेदन व पंचनाम्यासाठी मुंडके (डोके) शोधण्याची वेळ पोलिसावंर आली होती. अखेर सोमवारी (ता.18) शोधमोहीम पूर्ण झाली असून, डोके सापडले आहे. भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय 45, रा.पिंपळगाव निपाणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतकरी भाऊसाहेब तोरमल हे आपल्या घराच्या जवळच असणार्या विहिरीकडे गेले. विहिरीच्या कठड्याला एक नायलॉन दोरी बांधली आणि आपल्या गळ्यात अडकविली. त्यानंतर विहिरीच्या कठड्यावरून थेट विहिरीत उडी मारली. विहिरीत उडी मारताच गळफासच्या दोरीने त्याचे मुंडके आणि मुंडके नसलेले शरीर असे दोन तुकडे झाले. गळफासाच्या दोरीने त्याचा गळा कापल्यामुळे शरीराचे दोन भाग झाले आणि विहिरीत पडले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे अंगात फक्त अंतवस्त्र होते. पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने पत्नीने धाव घेतली असता पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती तिला समजली. तिने आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी येथे धाव घेतली. ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली त्यांनी पोलिसांना तत्काळ खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण हंडोरे, विजय खुळे आदी घटनास्थळी हजर झाले.
पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मयत तोरमल यांचा मृतदेह दुपारी तीन वाजता विहिरीतून बाहेर काढला असून त्यांचे मुंडके नसलेले शरीर पोलिसांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी उत्तरीय तपासणीसाठी ठेवले आहे. मात्र त्यांचे मुंडके विहिरीतून अद्याप काढता आलेले नव्हते. विहिरीत 30 ते 40 फूट पाणी असल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते. मात्र, मुंडके नसल्याने शवविच्छेदन करता येणे शक्य नव्हते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मुंडके शोधण्याची मोहीम सुरूच होती. सुमारे 60 ते 70 फूट खोल असणार्या विहिरीत 40 फूट पाणी उपसण्याचे काम सुरू होते. अखेर सोमवारी या मोहिमेस यश आले असून, मयत भाऊसाहेब तोरमलचे शरीरापासून वेगळे झालेले डोके सापडले. यामुळे पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तत्पूर्वी मयत तोरमल हे सकाळपासून बेचैन होते. व्यसनाधीनतेमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.