राजूर पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई दारु विक्रीसह जुगार अड्ड्यांवर छापेमारी; 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, अकोले
अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिलेले आहेत. त्यानुसार राजूर पोलिसांनी मंगळवारी (ता.22) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विविध पाच ठिकाणच्या अवैध दारु विक्रीसह जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 69 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना राजूरमधील दिगंबर रस्ता येथे राहुल अदालतनाथ शुक्ला हा अवैध देशी दारुची विक्री करत आहे असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यानुसार स्वतःसह पोहेकॉ.मुंढे, पोकॉ.गाढे, मपोकॉ.चोखंडे यांनी छापा टाकत 1800 रुपयांची देशी दारु पकडली. तसेच आरोपी राहुल अदालतनाथ शुक्ला यास ताब्यात घेत पोकॉ.गाढे यांच्या फिर्यादीवरुन त्याच्या विरोधात गुरनं. 51/2022 मुंबई प्रोव्हिशन क्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दुसरी कारवाई कोल्हार-घोटी रस्त्यावरील कातळापूर बस स्थानकाजवळ केली. पोहेकॉ.मुंढे, पोकॉ.फटांगरे, गाढे, मुळाणे हे नाकाबंदी करीत असताना दुचाकीवरुन (क्र.एमएच.04, जीबी.4745) नीलेश जयराम बिडवे (वय 35) व शरद दगडू शिंदे (वय 32, दोघेही रा. कातळापूर) हे 5 हजार 760 रुपयांच्या देशी दारुची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून दारुसह 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा 65 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोकॉ.गाढे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्याविरुद्ध गुरनं. 50/2022 मुंबई प्रोव्हिशन क्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तिसरी कारवाई माणिक ओझर येथे केली. पोहेकॉ.मुंढे, मपोकॉ.चोखंडे, पोकॉ.गाढे, मुळाणे यांनी अवैध दारु विक्री करताना लताबाई लक्ष्मण बोटे हिला पकडले. तिच्याकडून 660 रुपयांची देशी दारु जप्त केली. या प्रकरणी मपोकॉ.चोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी महिलेविरोधात गुरनं. 48/2022 मुंबई प्रोव्हिशन क्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

याच दिवशी चौशी कारवाई मवेशी येथे केली. पोहेकॉ.मुंढे, पोकॉ.गाढे यांनी मवेशीतील महादेव मंदिराच्या आडोशाला अवैध दारु विक्री अड्ड्यावर छापा टाकला असता शांताराम रामा भांगरे हा मुद्देमाल सोडून पळून गेला. त्याने टाकलेल्या पिशवीत 960 रुपये किंमतीची दारु आढळली. या प्रकरणी पोकॉ.आकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 48/2022 मुंबई प्रोव्हिशन क्ट 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर पाचवी कारवाई मटका अड्ड्यावर केली. पोहेकॉ.भैलुमे, पोकॉ.गाढे, फटांगरे, मुळाणे यांनी राजूर ग्रामपंचायत जवळ भिंतीच्या आडोशाला कल्याण मटका खेळताना तान्हाजी निवृत्ती लोहरे (वय 40, रा. माळेगाव), भाऊसाहेब दुंदा देशमुख (वय 37, रा. देशमुखवाडी केळुंगण) यांना पकडले. त्यांच्याकडून 640 रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोकॉ.अशोक गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 47/2022 मुंबई जुगार क्ट 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण कारवाई पोलिसांनी 69 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत असून, कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
