डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांतच सरासरीत तीन टक्क्यांची वाढ! बुधवारी शहरातील तेराजणांसह एकूण चौतिस जणांना झाली कोविडची लागण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्याने उंचावत नेलेला कोविड बाधितांचा आलेख डिसेंबरनेही अव्याहत ठेवल्याचे चित्र दिसत आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 49 रुग्णांची वाढ करणार्या कोविडने दुसर्या दिवशीही शहरातील तेरा जणांसह 34 जणांची भर घातली आहे. बुधवारी बाधित आढळलेल्या व्यक्तिंमध्ये शहरातील बाधित परिसरासह नव्याने काही भागातून रुग्ण समोर आल्याने कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. बुधवारी नव्याने वाढलेल्या रुग्णांनी तालुक्यातील रुग्णसंख्याही पुढे नेत 5 हजार 282 वर पोहोचवली आहे.

सणासुदीच्या काळात नागरिक कोविडची भिती घरातच ठेवून मनसोक्त खरेदीचा आनंद लुटतात असा पूर्वानुभव गणेशोत्सवादरम्यानच मिळाला होता. त्या अनुषंगाने यंदाची दिवाळी तालुक्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने भर घालण्यासोबतच दुसर्या लाटेला निमंत्रण देणारी ठरेल असा पूर्वानुमान शहरातील वैद्यकीय जाणकारांनी वर्तविला होता. त्यानुसार आता घडत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी नंतरच्या भाऊबीजेपासून तालुक्याच्या संक्रमणाची गती तब्बल दुप्पट झाली असून गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत कोविड रुग्ण समोर येण्याची गती सरासरी 22.33 तर दिवाळी नंतरच्या पंधरवड्यात त्यात तब्बल 16 टक्क्यांची भर पडून सरासरी ती 38.27 टक्क्यांवर पोहोचली होती.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील गणेशोत्सव व त्यानंतर मोहरमच्या सणांमुळे सप्टेंबरमध्ये कोविड बाधितांची गती वाढल्याचे सांगीतले जात होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोविडचा शिरकाव झाल्यापासून आजवर सर्वाधिक 1 हजार 529 रुग्ण याच महिन्यात समोर आले होते. मात्र नंतरच्या ऑक्टोबरमध्ये कोविडचा वेग बराच मंदावल्याने दिलासाही निर्माण झाला होता. मात्र दिवाळीत तर बहुतेक अख्खा तालुकाच खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडल्याने डिसेंबरमध्ये बाधितांचा आकडा किती फुगतो याचे कयास लावणेही अवघड होवून बसले आहे.

नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात रुग्णगती वाढून सरासरी 38.27 झाली असतांना डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांनीच त्यात आणखी तीन टक्क्यांची भर घालीत सरासरी 41.5 च्या रुग्णगतीने 83 रुग्णांची भर घातली आहे. बुधवारी (ता.2) आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तेरा जणांचा समावेश असून त्यात गणेशनगरमधील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 38 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरुण, स्वागत मंगल कार्यालय परिसरातील 50 वर्षीय महिला, लाल बहाद्दुर शास्त्री चौकातील 52 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, जेधे कॉलनीतील 31 वर्षीय तरुण, अकोले नाक्यावरील 48 वर्षीय महिला, देवीगल्लीतील 42 वर्षीय महिला, गंगासृष्टी जवळील 48 वर्षीय इसम, घोडेकर मळा परिसरातील 29 वर्षीय महिला व मालदाड रोडवरील 31 व 19 वर्षीय तरुणांचा समावेश आहे.

त्यासोबतच बुधवारी ग्रामीण रुग्णसंख्येतही 21 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यात तळेगाव दिघे येथील 57 वर्षीय इसम, निमगाव बु. येथील 45 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 55 वर्षीय इसमासह रहाणेमळा परिसरातील 44 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुणी, उंबरी बाळापूरमधील 45 वर्षीय इसम, राजापूरमधील 50 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, सावरगाव तळमधील 21 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 38 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 32 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 32 वर्षीय तरुण, निमजमधील 58 वर्षीय इसम, खांडगाव येथील 50 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी व 17 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. मधील 40 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळमधील 62 वर्षीय महिला व धांदरफळ खुर्दमधील 40 वर्षीय महिला, झोळे येथील 50 वर्षीय इसम व अंभोरे येथील 56 वर्षीय इसमासह एकूण 34 बाधितांची बुधवारी नव्याने भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 5 हजार 282 वर पोहोचली आहे.

सद्यस्थितीत आढळून येणारे रुग्ण लक्षणे नसलेल्या स्वरुपाचे आहेत. सुरुवातीला काही प्रमाणात जाणवणार्या शारीरिक बदलांकडे व होणार्या किरकोळ त्रासाकडे ‘साधारण’ समजून दुर्लक्ष केले जात असल्याने असे रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत समोर आलेल्या रुग्णांमध्ये अशा रुग्णांचा अधिक भरणा असून विशेष म्हणजे त्यातही तरुण वयातील बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला अगदी किरकोळ त्रास होत असला तरीही त्याने आपली स्राव चाचणी करुन घेण्याची गरज आहे. अन्यथा त्याकडे होणारे दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर बेतण्याचीही दाट शक्यता आता निर्माण झाली आहे.

