तालुक्यात आढळले पुन्हा पंधरा नवीन रुग्ण! आजही शहर व तालुक्यातील नवीन भागात प्रादुर्भाव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर कायम असून आजही नव्याने पंधरा रुग्ण समोर आले आहेत. यातील काही रुग्ण संक्रमिताच्या संपर्कातून तर काही पहिल्यांदाच समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजची संख्या कमी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही भर पडल्याने रुग्णसंख्या 1 हजार 253 वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने कोविडचे संक्रमण होत असल्याचे समोर आले आहे. दररोज 30 ते 50 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याच्या रुग्ण संख्येने दोनच दिवसांपूर्वी बाराशेचा टप्पा पार केला होता. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल अकराशेहून अधिक रुग्णांची भर पडली आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून सात तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून आठ रुग्ण समोर आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील तहसील कार्यालयाजवळील 52 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली परिसरातील 57 वर्षीय पुरुष, गणेश नगर परिसरातील 47 वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनीतील 42 वर्षीय महिला, तर तालुक्यातील घारगाव येथील 42 वर्षीय इसम, म्हसवंडी येथून प्रथमच 68 वर्षीय इसम तर अकलापुर मधूनही पहिल्यांदाच 32 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील 44 वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातून 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, सुकेवाडी परिसरातून 16 वर्षीय तरुणी, ढोलेवाडी परिसरातून 45 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 45 वर्षीय महिला तर माळवाडी येथील दोन वर्षीय बालकासह 34 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

संगमनेर तालुक्याच्या रूग्ण संख्येत दररोज मोठी भर पडत असल्याने व दररोज कोरोनाच्या विषाणूंचा वेगवेगळ्या नवीन भागात प्रादुर्भाव होत असल्याने गेल्या 30 जून रोजी 109 वर असलेली तालुक्यातील रुग्णसंख्या अवघ्या पन्नास दिवसांत 1 हजार 253 वर जाऊन पोहोचली आहे.





