केंद्रातील भाजप सरकार भांडवलदारधार्जिणे ः कानडे श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे महागाईमुक्त भारत अभियान

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
केंद्रातील भाजप सरकार हे भांडवलदारधार्जिणे आहे. श्रम करून घाम गळणार्‍यांचे श्रम चोरणारे आहे. पेट्रोल-डिझेल दराचे रोज नवे उच्चांक होत आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून, महागाईने जनता त्रस्त झाली आहे, असा घणाघात काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी केला.

काँग्रेसच्यावतीने महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत सोमवारी (ता.4) आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयापासून लाँग मार्च काढण्यात आला. शिवाजी रस्त्याने जाऊन तहसील कार्यालयासमोर मार्चचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी कानडे बोलत होते. यावेळी इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, अंजूम शेख, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, अंकुश कानडे, अशोक कानडे, अशोक बागूल, सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, समीन बागवान, अप्सरा शेख, सतीश बोर्डे, किशोर बकाल आदी होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार कानडे म्हणाले, मोदी यांचे मित्र अदानी जगातील दहा श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले. गोरगरीब जनतेवर भाववाढीचा बोजा लादायचा, त्याचबरोबर त्यांचा घाम गाळून मिळवलेला पैसा ओरबाडायचा आणि भांडवलदार मित्राची भरभराट होण्यासाठी मदत करायची नीती आहे. काँग्रेस पक्षाची उज्ज्वल परंपरा रचनात्मक आणि विकासात्मक काम करण्याची आहे. गरिबाला जगविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना पक्षाने आखून गोरगरिबांचे कल्याण साधले आहे. आता ही विचारधारा बळकट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

उक्कलगाव येथे झालेला वाद, त्यानंतर अंजूम शेख गट व आमदार कानडे यांच्यात वाढत्या जवळीकीमुळे कानडे व ससाणे यांच्यात सर्वच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या लाँग मार्चकडे काँग्रेसचे महासचिव करण ससाणे व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले.

Visits: 78 Today: 1 Total: 1104214

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *