नगर व नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे ‘समन्यायीचे’ संकट टळणार! निळवंड्यातून सहा हजाराचा विसर्ग; हंगामात प्रवरेला पहिल्यांदाच मोठा पूर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण राज्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणार्या तुफान पावसाने धरणांची स्थिती समाधानकारक अवस्थेत पोहोचवली आहे. गेल्या 72 तासांपासून नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात कोसळणार्या पावसामुळे दारणा धरण समूहातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून जायकवाडीच्या दिशेने पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जायकवाडीच्या उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होवू लागल्याने नाशिक व नगर जिल्ह्यावरील ‘समन्यायी’चे संकट टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुडूंब भरलेल्या भंडारदरा धरणातून सध्या 7 हजार 744 क्युसेक्स विसर्ग सुरु असून दुपारी तीन वाजेपासून निळवंडे धरणातूनही 6 हजार 65 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या निळवंडे धरणाचा पाणीसाठा 93 टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने विसर्गात मोठी वाढ केली जाणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीलाच दडी मारुन बसलेल्या वरुणराजाचे गेल्या बुधवारी (ता.8) राज्यात सर्वदूर पुनरागम झाले. त्यातच नगर व नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने लाभक्षेत्रातील चिंतेचे ढग बाजूला सरुन चैतन्य निर्माण झाले आहे. रविवारी (ता.12) सकाळी 11 वाजता भंडारदरा धरण भरल्यानंतर धरणातून सुरुवातील 4 हजार 400 क्युसेक्स व त्यानंतर 7 हजार 744 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात असल्याने आज सकाळी सहा वाजता 90 टक्के भरलेले निळवंडे धरण दुपारी तीन वाजेपर्यंत 93.39 टक्क्यांवर पोहोचले. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने आज पहाटेपासून सोडण्यात येणार्या 685 क्युसेक्स विसर्गात मोठी वाढ करुन 6 हजार 65 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रवरामाई दुथडी भरुन वाहू लागली आहे. सध्या निळवंडे धरणात आठ हजार क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून आज सायंकाळपर्यंत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहाच्या पाणलोटातही संततधार सुरु असल्याने धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून दारणा धरणातून गोदावरी नदीपात्रात 10 हजार 60 तर गंगापूर धरणातून 1 हजार 520 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोपरगावनजीकच्या नांदूर मधमेश्वरजवळ पाण्याची प्रतिसेकंद वेग 16 हजार 582 क्युसेक्सवर पोहोचला असून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची जावक सुरु झाल्याने स्थिरावलेला जायकवाडीचा महाकाय जलसाठा पुन्हा हलू लागला असून आता त्यात निळवंडे धरणातून सोडलेले पाणीही मिसळणार असल्याने जिल्ह्यावरील समन्यायी पाणीवाटपाचे संकट टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा 68.60 टक्के तर उपयुक्त पाणीसाठा 58 टक्के झाला आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्यानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के असणे आवश्यक आहे.

महिन्याभराच्या विलंबानंतर रविवारी (ता.12) नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर धरणातून सुरुवातीला 4 हजार 400 क्युसेक्स तर त्यानंतर 7 हजार 744 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात सुरुवात झाल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठाही झपाट्याने वाढून आज दुपारी तीन वाजेपर्यंत तो 93.39 टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाची सुरक्षितता म्हणून 6 हजार 65 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळपर्यंत त्यात दुपटीहून अधिक वाढ होण्याची दाट शक्यता असून प्रवरानदीला मोठा पूर येण्याची शक्यतास असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा आदेश दिला आहे. उशीरा का होईना जिल्ह्यातील मोठी धरणे भरु लागल्याने व त्यातच जायकवाडी जलाशयासाठी आवश्यक असलेले पाणीही वाहू लागल्याने जिल्ह्यातील धरणांच्या लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात आजही पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासांत सलग तिसर्या दिवशी रतनवाडीत 195 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर पांजरे येथे 135 मिलीमीटर, घाटघर 134 मिलीमीटर, भंडारदरा 133 मिलीमीटर, वाकी 123 मिलीमीटर, निळवंडे 44 मिलीमीटर, आढळा 06 मिलीमीटर, कोतुळ 02 मिलीमीटर, अकोले 32 मिलीमीटर, संगमनेर 10 मिलीमीटर, श्रीरामपूर 26 मिलीमीटर व शिर्डी येथे 19 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आले आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 817 दशलक्ष घनफूट, भंडारदरा धरणात 480 दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणात 559 दशलक्ष घनफूट, आढळा धरणात 38 दशलक्ष घनफूट व भोजापूर धरणात अवघे तीन दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. सध्या मुळा धरणाचा पाणीसाठा 22 हजार 914 दशलक्ष घनफूट (88.13 टक्के), भंडारदरा 11 हजार 39 दशलक्ष घनफूट (100 टक्के), निळवंडे 7 हजार 778 दशलक्ष घनफूट (93.39 टक्के), आढळा 623 दशलक्ष घनफूट (58.77 टक्के) व भोजापूर धरणाचा पाणीसाठा 88 दशलक्ष घनफूट (24.38 टक्के) इतका झाला आहे. उशीरा का होईना जिल्ह्यातील एकामागून एक धरणं भरु लागल्याने लाभक्षेत्रात आनंद दाटला आहे.

रविवारी भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणात आवक होत असलेल्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मागील चोवीस तासांत निळवंडे धरणाचा पाणीसाठा तब्बल दहा टक्क्यांनी वाढल्याने आज दुपारी 3 वाजता धरणातून प्रत्यक्ष नदीपात्रात 6 हजार 65 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणात साडेआठ हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु असल्याने सायंकाळपर्यंत निळवंडे धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग दुपटीने वाढणार असून प्रवरा नदीला हंगामात पहिल्यांदाच मोठा पूर येणार आहे.

