संगमनेरातील सर्वच नद्यांच्या पात्रावर वाळूचोरांचे ‘अधिराज्य’! खांडगाव शिवारातील कारवाईत एका जेसीबीसह एक ढंपर महसूलच्या ताब्यात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माती मिश्रीतच्या नावाखाली तालुक्यातील नद्यांचे पात्र अहोरात्र ओरबाडले जात असून वाळूतस्करांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नद्यांच्या पात्रात काही ठिकाणी ‘लिलावा’च्या गोंडस नावाखाली तर अनेक ठिकाणी ‘बिनधास्त’ वाळूची लुट सुरु आहे. याबाबत चोहोबाजूंनी ओरड सुरू झाल्यानंतर महसूल विभागाने कारवाईच्या दिशेने एक पाऊल उचलले असून आज सकाळी खांडगाव शिवारातील कारवाईत एका हायवासह एक जेसीबी यंत्र ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवरा पात्रातून चक्क जेसीबीद्वारा बेकायदा वाळू उपसा सुरू असण्याचा प्रकार संगमनेर शहरातील फोफावलेल्या वाळू तस्करीचे जिवंत चित्र उभे करणारा आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी खांडगाव शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार तहसीलदार अमोल निकम यांनी कामगार तलाठी संजय शितोळे, योगिता शिंदे व संग्राम शिंदे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार महसूल पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून खातरजमा केली असता खांडगाव शिवारातील नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांना दिसले. मात्र त्याचवेळी वाळूचोरांची नजरही पथकावर पडल्याने पथक प्रत्यक्ष घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच त्यातील एक हायवा (ढंपर) आणि दोन ट्रॅक्टर तेथून पसार झाले.

त्यामुळे वरील कर्मचार्‍यांनी आपले वाहन सोडून थेट धावतच पळून जाण्याच्या तयारीत असलेला उर्वरीत एक हायवा आणि अवघ्या चार मिनिटांतच ढंपर भरणारा जेसाबी यांना अटकाव केला. यावेळी वाळूतस्कर आणि महसूल पथकामध्ये शाब्दिक चकमकही घडली, मात्र त्याला महत्त्व न देता सदरची दोन्ही वाहने ताब्यात घेत पथकाने ती तहसील कार्यालयाच्या आवारात आणली आहेत. या दोन्ही वाहनांच्या मालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात वाळू तस्करीला प्रचंड ऊत आला असून हायवा, ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, बैलगाड्या आणि गाढवांवरुन मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. यापूर्वी जेसीबीचा वापर करुन केवळ पठारभागातील मुळा नदीपात्रातून वाळूचोरी होत असत, मात्र आता शहरालगतच्या नदीपात्रातही जेसीबी उतरु लागल्याने तालुक्यातील सर्वच नद्यांचे जीवन धोक्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मजुरांचा वापर करुन एक हायवा भरण्यासाठी जवळपास दोन तास लागतात, तर जेसीबी यंत्राद्वारे चार ब्रास (चार ट्रॅक्टर) वाळू भरण्याची क्षमता असलेला हाच अवाढव्य ढंपर अवघ्या चार मिनिटांत ओसंडला जातो. याचाच अर्थ मजुरांद्वारा एक ढंपर भरेपर्यंत जेसीबी तब्बल 30 ढंपर भरु शकतो. यावरुन नदीपात्रात सुरू असलेली लुट सहज लक्षात येते.


संगमनेर तालुक्यातील काही भागात ‘माती मिश्रीत’च्या गोंडस नावाखाली काही तस्करांनी वाळूचे लिलाव घेतले आहेत. त्यातील अटी व शर्थीनुसार नदीपात्रालगत असलेल्या शेतजमीनीत पुरामुळे वाहून आलेली व शेतात पसरलेली माती मिश्रीत वाळू मातीसह उचलण्याला परवानगी दिली जाते. कायद्यातील हाच धागा पकडून संगमनेरातील पठारासह अनेक भागात सध्या वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. माती मिश्रीतचा परवाना मिळवताना सरकारला किरकोळ ‘रॉयल्टी’ भरावी लागते. मात्र प्रत्यक्षात त्या बदल्यात थेट नदीपात्रातूनच दिवसभर शेकडो ब्रास वाळू उपसली जाते.

जोर्वे आणि निंभाळे या गावाच्या दरम्यानही असाच परवाना काढून थेट नदीपात्रातून हजारो ब्रास वाळू चोरी सुरू आहे. दैनिक नायकला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार येथील माती मिश्रीतचा लिलाव एका ‘राजकीय’ युवा नेत्याच्या आशीर्वादाने त्यांच्या बगलबच्चांनी घेतला असून दिवसभरात तेथून तब्बल 50 ढंपर वाळू उपसली जात आहे. प्रत्यक्षात मात्र येथील शेतात पुराच्या पाण्यासोबत आलेल्या वाळूची मोजदाद अवघी 200 ब्रास दाखवण्यात आली असून तितकी वाळू तर एकाच दिवशी उचलली जात असल्याचे ढंपरच्या एकूण संख्येवरुन दिसून येते. विशेष म्हणजे सदर ठिकाणची वाळू उपसण्यासाठी तब्बल 6 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्याचीही माहिती मिळाली आहे. म्हणजे 200 ब्रास माती मिश्रीतची रॉयल्टी भरुन अवघ्या 10 दिवसांत तब्बल दोन हजार ब्रास वाळू चोरी करण्याचे नियोजन संबंधित वाळू चोराने केले असून ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र त्याने नदीपात्रातच मुक्काम ठोकला आहे. संगमनेर तालुक्यातील भयानक वाळू तस्करीमुळे सर्वच नद्यांची पात्रे विद्रूप झाली असून पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यासोबतच शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूलही बुडत असून त्यापोटी राजकीय कार्यकर्ते पोसले जात आहेत. त्यातून तालुक्यातील गुन्हेगारांच्या संख्येतही भर पडत असल्याने संगमनेरचा प्रवास दक्षिणेतील तालुक्यांच्या दिशेने सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे.

सध्या तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पात्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. यातील काही ठिकाणी माती मिश्रीतच्या गोंडस नावाखाली शासनाला किरकोळ रॉयल्टी भरुन राजरोस नदीवर दरोडे घातले जात आहेत. यामागे एका राजकीय युवा पुढार्‍याचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. निंभाळ्यानजीकही असाच प्रकार सुरु असून अवघी दोनशे ब्रास माती मिश्रीत वाळू उचलण्याची परवानगी असताना येथून एकाच दिवसात तब्बल पन्नासाहून अधिक ढंपर वाळू थेट नदीपात्रातून उचलली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पात्रावर वाळू चोरांचे अधिराज्य असल्याचे भयानक दृष्य दिसत आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 119153

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *