संत गाडगेबाबांचे शिष्य बनून स्वच्छतेस शुभारंभ करा ः हासे ग्राम स्वच्छता अभियानाची सांगता व प्रमाणपत्र वितरण समारंभ
नायक वृत्तसेवा, अकोले
ग्राम स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांनी गावची गावे स्वतः आणि शिष्यांनी स्वच्छ करून समाजापुढे स्वच्छतेचा आदर्श ठेवला. त्यांच्याच कार्याचा भाग म्हणून आज देशात ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात आहे. बाबांचे आचार-विचार कृतीत स्वीकारा. त्यांचेच शिष्य बनून स्वच्छतेच्या कामास शुभारंभ करा असे आवाहन पर्यावरणवादी व औषधी वनस्पती अभ्यासक रामलाल हासे यांनी केले.
ग्राम स्वच्छता अभियान सांगता व प्रमाणपत्र वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या अभियानाचे आयोजन ग्राम स्वच्छता जनशिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार व सदशा कमल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका पुष्पा निगळे व दीपाली शिंदे यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख होते. तर कालिंदी हासे, वैशाली चोथवे, रंजना लोंढे, दत्तात्रय निगळे आदी उपस्थित होते.
जनशिक्षण संस्था दुर्गम भागात गरजू, होतकरु व उपेक्षितांंना कौशल्य विकास करणारे प्रशिक्षण देते ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. संस्थेने महिलांना 15 दिवस स्वच्छता अभियानात मार्गदर्शन केले. आज सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करुन यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास पर्यावरणवादी रामलाल हासे यांनी व्यक्त करुन संत गाडगेबाबांच्या कार्यावर प्रकाश टाकून महिलांना स्वच्छता कार्यास प्रवृत्त करण्यास ऊर्जा दिली. स्वच्छता कामात महिलांची महत्त्वपूर्ण कामगिरी, आरोग्याचे महत्त्व व पर्यावरण अशा अनेक विषयांवर देखील त्यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेची चळवळ उभी करा असे आवाहन केले. प्रास्ताविक बाळासाहेब पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय निगळे यांनी केले.