प्रयोगशील शेतकर्याच्या जीवनात ढोबळी मिरचीने भरला ‘रंग’! रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीतून कमावला लाखो रुपयांचा नफा
महेश पगारे, अकोले
वीरगाव व देवठाण गावांच्या शिवावरील प्रयोगशील शेतकरी डॉ. जालिंदर खुळे यांनी रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीतून दोन महिन्यांत आठ लाखांचे उत्पन्न काढले आहे. यामुळे हतबल झालेल्या शेतकर्यांना सावरण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
प्रयोगशील शेतकरी डॉ. जालिंदर खुळे हे कायमच पारंपारिक शेतीला छेद देत नवनवीन प्रयोग करत आले आहेत. संरक्षित शेती अंतर्गत सव्वादोन एकर क्षेत्रावरील शेडनेटमध्ये रंगीत (लाल व पिवळी) ढोबळी मिरचीची लागवड केली. यासाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा कुशलतेने वापर केला. याकामी एकरी सव्वा ते अडीच लाख रुपयांचा खर्च केला. याचबरोबर वेळोवेळी कृषीतज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला. सध्या काढणी सुरू आहे.
ढोबळी मिरचीमध्ये क जीवनसत्त्व व खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्याने कोविडमध्ये ढोबळीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे बाजारात प्रचंड मोठी मागणी राहत आहे. तसेच पंचतारांकित हॉटेलमध्येही मोठा वापर होत आहे. यामुळे प्रतीकिलोला 130 ते 140 रुपयांचा दर मिळत असून, सरासरी 50 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. यातून 8 लाख रुपयांचे सरासरी एकूण उत्पन्न मिळाले असून, खर्च जाता पाच लाख रुपयांचा नफा शिल्लक राहिला आहे. यापूर्वी देखील अवकाळी पावसापासून द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी दोन एकर बागेवर प्लास्टिक कागदांचे आच्छादन टाकले. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकर्यांना त्यांच्या प्रयोगशील शेतीतून प्रेरणा मिळत आहे.
संरक्षित शेती ही खर्चिक जरी असली तरी जोखमीची नसते. कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि बाजाराचा अंदाज घेऊन पीक काढल्यास नक्कीच फायदा होतो.
– डॉ. जालिंदर खुळे (ढोबळी मिरची उत्पादक)