घोडेगावात मखर चोरी प्रकरणी ग्रामस्थांचा रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले सतरा किलो चांदीचे मखर बुधवारी (18 नोव्हेंबर) रात्री चोरी झाले. त्याचा तपास बारा दिवस उलटूनही लागलेला नाही. या चोरीचा तातडीने तपास लावावा, या मागणीसाठी संतप्त घोडेगाव ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी (ता.2) सकाळी 10 वाजता रास्ता रोको व गावबंद आंदोलन केले.
चोरी प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक करावी. सतरा किलो चांदीचे नक्षीकाम असणारे मखर पूर्ववत देवीस बसवावे, या मागणीसाठी सकाळी दहा ते दहा पंचवीस असे पंचवीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवारी सकाळपासून अकरा वाजेपर्यंत गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सातशे ते आठशे सह्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले. आंदोलनकर्त्यांच्या निवेदनाला उत्तर देताना शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.