चंदुकाका सराफची कुपोषण निर्मुलन प्रकल्पास मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नैतिक मूल्यांच्या आधारावर चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सुवर्णपेढी पारदर्शी व्यवसायाचा वारसा जपत आली आहे. त्याला यावर्षी 195 वर्षे पूर्ण झालेली आहे. या वाटचालीमध्ये सर्वात महत्वाचा वाटा असंख्य आणि अमूल्य ग्राहकांचा राहिला आहे. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीचं नातं चंदुकाका सराफ सुवर्णपेढीने जनमानसात निर्माण केलेलं आहे. याच बळावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेस घारगाव (ता.संगमनेर) कार्यालयांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अंगणवाड्यांमध्ये 62 कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी कुपोषण निर्मुलन कामी पोषक आहार प्रदान केला आहे.

या उपक्रमावेळी गटविकास अधिकारी, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत एक सामाजिक बांधिलकी समजून आवश्यक आहार व औषधांचा पुरवठा करण्याचं योगदान चंदुकाका सराफ सुवर्णपेढीने दिलेलं आहे. त्या मुलांना यातून सलग तीन महिन्यांसाठी योग्य पोषण मिळण्यास, पर्यायाने तालुका कुपोषण मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर समाजातील वंचित घटकांना आपल्या परीने हातभार लावण्याला सुवर्णपेढीने नेहमीच प्राधान्यक्रम दिलेला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
