दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने वृद्धाचा केला खून! स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत दोघांना केले जेरबंद


नायक वृत्तसेवा, घारगाव
दारुसाठी मंदिर परिसरात झोपलेल्या वृद्धाच्या खिशातून पैसे काढले, नंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून मारले. मग, दोघेही डोंगरात जाऊन लपले, पण स्थानिक गुन्हे शाखेला तपास लागताच दोघांना अवघ्या २४ तासांत जेरबंद केले.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे देवराम मुक्ता खेमनर यांचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. त्यांचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोहेकॉ. अतुल लोटके, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल यांचे पथक तयार केले.

पथकाने घटनास्थळी जात आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरु केला. यादरम्यान पोलीस निरीक्षक आहेर यांना संशयित नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा. चिंचेवाडी, साकूर, ता. संगमनेर) व सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकूर, ता. संगमनेर) हे दोघे चिंचेवाडी डोंगरामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली. पथकाने चिंचेवाडी परिसरातील डोंगरात जात दोघांना ताब्यात घेतले. दारु पिण्यासाठी देवराम खेमनर यांच्या खिशातील पैसे काढून त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे त्यांनी संगितले. यातील आरोपी नामदेव सोन्नर हा इतर गुन्ह्यांतील फरार आरोपी असल्याचेच समोर आले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत दोघांना जेरबंद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *