‘करिअर कट्टा’ महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम ः शितोळे अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात करिअरबाबत व्याख्यान

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातून दरवर्षी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. परंतु स्पर्धेच्या युगात योग्य दिशा व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने त्यांचे करिअर निर्माण करणे शक्य होत नाही. प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील तरुणांचा टक्का कमी होत आहे. म्हणून तरुणांना स्पर्धाशील बनविणे व स्वयंभू बनविण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या संकल्पनेतून ‘करिअर कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.
![]()
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण सहाय्यता केंद्र व राजूर (ता.अकोले) अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद व मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असेल तर तो नाद सोडून नोकरी शोधण्यापेक्षा आपण इतरांना नोकरी देऊ शकतो असा विचार करून उद्योजक बनावे व स्वयंभू व्हावे. यासाठी करिअर कट्टा या उपक्रमाची मदत होईल. महाराष्ट्रातील तरुणांनी मोठा उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे. यादृष्टीने अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाने राबविलेले उपक्रम दिशादर्शक आहेत. यापुढील काळात आपल्या महाविद्यालयाने व्यवसायभिमुख कोर्स चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही महाविद्यालयात उपक्रम राबवत आहोत. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सक्षम व स्वयंभू बनविणे हाच आमचा संकल्प आहे. शासनाच्या करिअर कट्टा या उपक्रमाचा विद्यार्थी मोठ्या संख्येने लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. रोहित मुठे यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय व सूत्रसंचालन केले. तर डॉ. एल. बी. काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. बी. के. तपळे, प्रा. संदेश कासार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. बी. एम. पवार, डॉ. तांबे, प्रा. संतोष अस्वले, प्रा. तेलोरे, प्रा. आवारी, डॉ. आर. आर. सोनवणे, विलास लांघी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
