आंबीफाटा ते आंबीदुमाला रस्त्याची दयनीय अवस्था पाठपुरावा करुनही काम होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीफाटा, आंबीदुमाला ते म्हसवंडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावरील खडीही निघून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना छोट्या-मोठ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहे.

पठारभागातील म्हसवंडी, आंबीदुमाला गावांसह आजूबाजूच्या वाड्या-वस्त्या या सर्वांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम व्हावे म्हणून दोन्ही गावच्या नागरिकांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर नागरिकांच्या प्रयत्नांना यशही आले. विशेषतः मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सहा किलोमीटर अंतर रस्त्याचे काम होणार असल्याने नागरिक चांगलेच खूष होते.

मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करत खडीही टाकली. दरम्यानच्या काळात पुढे काम न झाल्याने आता रस्त्यावरील खडी सुद्धा निघून गेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खडीच खडी पसरलेली दिसत आहे, तर अनेक खड्डेही पडले आहेत. यामुळे छोटी-मोठी वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुचाकीस्वार जीव मुठीत धरुन प्रवास करत आहे. याला वैतागून ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले असून, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन जोखडातून मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.

Visits: 192 Today: 1 Total: 2167076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *