प्रवरासंगम येथे दगडाला दुधाचा अभिषेक; स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन दूध मूल्य आयोगाची स्थापना करा आणि हिशोबा समाजापुढे मांडा ः डॉ. ढगे
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील प्रवरासंगम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे व भक्ती जगधने यांच्या हस्ते दगडाला दुधाचा अभिषेक घालून व पूजा करून दूध उत्पादक शेतकर्यांमार्फत सोमवारी (ता.9) अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारने दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी व त्याचा हिशोब समाजापुढे मांडावा अशी मागणी कृषीतज्ज्ञ व शेतकरी नेते डॉ. अशोक ढगे यांनी यावेळी बोलताना केली.
दुधाचा उत्पादन खर्च, ग्राहकाला मोजावी लागणारी किंमत तसेच प्रक्रिया खर्च याचा सर्व हिशोब समाजापुढे येण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी. कारण दूध तज्ज्ञांच्या कृषी विद्यापीठातील अभ्यासकांचे मते एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी 24 ते 28 रुपये खर्च येतो. मात्र शेतकर्यांना आज 22 रुपये प्रतिलिटर दिले जातात. त्यामुळे पशुपालकांचा दूध उत्पादन खर्चही निघत नाही. शासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे डॉ. अशोक ढगे यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी दगडाला दुधाने अभिषेक केला, कारण शेतकर्यांसाठी सरकारची दगडासारखी भूमिका आहे. गायीच्या दुधाला रुपये पस्तीस रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रतिलिटर भाव द्यावा अशी जोरदार मागणी देखील केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. याप्रसंगी अशोक खैरे, जिल्हा उपाध्यक्ष दौलत गणगे, तालुकाध्यक्ष दादासाहेब नादे, हरीभाऊ देवरे, बापू डावकर, जगन्नाथ कोडे, अरुण रांधवणे, शुभम जगधने आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.