कार्तिक पौर्णिमेनिमित्त देवगडचे भाविकांनी घेतले मुखदर्शन
नायक वृत्तसेवा, नेवासा
कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने सोमवारी (ता.30) नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गाभारा दर्शन बंद असल्याने भाविकांनी शासकीय नियमांचे पालन करत व मास्क लावून कीर्तन मंडपातूनच मुखदर्शन घेतले.
रविवार व सोमवार असे दोन दिवस आलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी आलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे श्री गुरूदेव दत्तपीठाचे प्रमुख भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. कार्तिक पौर्णिमेस रविवारी दुपारी 12.47 पासून प्रारंभ झाला असून सोमवारी पहाटे 6 वाजून 3 मिनिटे असा कार्तिक पौर्णिमेचा मुहूर्त होता. त्यामुळे मंदिर परिसर व प्रवरानदी घाटावर गर्दी होणार नाही याची काळजी स्वयंसेवक व सेवेकर्यांनी घेतली होती. सदर कार्तिक पौर्णिमा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी भक्त मंडळाच्यावतीने चांगदेव साबळे, मारुती साबळे, सरपंच अजय साबळे, संदीप साबळे, राजेंद्र गिते, महेंद्र फलटणे, बाळू कानडे, तात्या शिंदे आदिंनी स्वयंसेवकांची भूमिका बजावली. शेवटी वेदमंत्रांचा जयघोष करत झालेल्या आरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.