गटारबळी प्रकरणात पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचाही हात? गेल्या गुरुवारी दोघांचा गेला होता बळी; आठवड्यानंतरही गटाराचे तोंड उघडेच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आडहत्यारी ठेकेदाराच्या हलगर्जीपणातून गेल्या गुरुवारी संगमनेरातील दोघांना जीव गमवावा लागला. संताप निर्माण करणार्या या दुर्घटनेत मृत्यू पावलेली दोन्ही मुलं अतिशय तरुण होती. त्यामुळे शहरात हळहळ निर्माण होवून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होवू लागली. त्या दबावातूनच या प्रकरणात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या मुख्य ठेकेदारासह घटनेला थेट कारणीभूत असलेल्या साफसफाई ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील मुश्ताक शेख याला अटक होवून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी होवून ठेकेदाराचीच चूक असल्याचे सांगत पालिकेने आपले हात झटकले खरे, मात्र या घटनेमागे पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांचाही सूप्त सहभाग असल्याची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहातही या विषयाकडे लक्ष वेधताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेला पालिकेतील काही अधिकारीही दोषी असल्याचा स्पष्टपणे उल्लेख केला होता. या दुर्दैवी घटनेत दोघा तरणाबांड मुलांचा बळी गेल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे, अशावेळी पोलिसांनीही कोणाचाच मुलाहिजा न जोपासता प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषी असल्यास पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांसह अन्य सहभागी अधिकार्यांवरही कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पालिकेचे ‘गटार आख्यान’ हा संशोधनाचा विषय असला तरीही त्यातून गेल्या गुरुवारी (ता.10) घडलेली घटना संपूर्ण तालुक्याला वेदना देणारी ठरली
आहे. या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातही उमटले. आमदार अमोल खताळ यांनी केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे अशाप्रकारे काम करुन घेण्यास मनाई असतानाही पालिकेच्या ठेकेदाराकडून त्याची सर्रास पायमल्ली झाल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना घटनेचे गांभीर्य नमूद केले. वरीष्ठ सभागृहात आमदार सत्यजीत तांबे यांनी तर थेट पालिकेच्या आरोग्य अधिकार्याकडे बोट दाखवून ठेकेदारासह त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली. खरेतर या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी संतप्त झालेला जमाव मुख्याधिकार्यांवर रोषही व्यक्त करु पाहत होता. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती सावरल्याने पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणात पालिकेच्यावतीने आरोग्य निरीक्षक अमजद पठाण फिर्यादी झाले असून त्यांनी 2021 पासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातील सर्व गटारांचे नूतनीकरण, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मेसर्स आर.एम.कातोरे आणि कंपनी यांच्याकडे असल्याचे नमूद करुन
शहरातील सर्व बंदीस्त व भूयारी गटारांच्या साफसफाईचे काम मेसर्स बी.आर.क्लिनिंग या कंपनीमार्फत केले जात असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये संबंधित कंपनीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. एक ते 30 इतक्या अटी व शर्थी लादून मुश्ताक बशीर शेख या ठेकेदाराला काम दिल्याचे व कोल्हेवाडी रस्त्यावरील गटाराचे काम करताना कराराचे उल्लंघन करण्यासह पालिकेची परवानगी न घेताच ठेकेदाराने परस्पर गटार उकरल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीतून करण्यात आला आहे. त्यातून पालिकेचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आला आहे.

एकंदरीत या संपूर्ण तक्रारीतून पालिकेने आणि त्यातही विशेषतः आरोग्य निरीक्षकांनी सहीसलामत आपली चामडी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रथमदर्शनी या प्रकरणाला साफसफाई ठेकेदार मुश्ताक बशीर शेख हाच थेट जबाबदार असताना सामाजिक दबावातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातंर्गत गटारांचे काम घेणार्या रामहरी कातोरे आणि त्यांचा मुलगा निखिलवरही आरोप ठेवण्यात आले. मात्र त्याचवेळी शहरातील आरोग्य विभागाचा कोणताही विषय ज्याच्या संमती शिवाय होवूच शकत, सदरची गटार उकरली जात असल्याची माहितीही ज्याला दुर्घटनेपूर्वीच होती अशा आरोग्य निरीक्षकांनी स्वतःला मात्र अल्हादपणे या प्रकरणातून बाजूला केले. यापूर्वी या महाशयांचे कचरा ठेकेदाराशी संधान साधून घंटागाड्यांद्वारा गोवंश कत्तलखान्यातील टाकावू अवशेष पालिकेच्या कंपोस्ट डेपोत दडवणे, पकडलेली मोकाट जनावरं परस्पर सोडून देणे अशा उद्योगात नाव आले होते. त्यावेळी त्याची पापं दुसर्या निष्पाप कर्मचार्याला भोगावी लागली होती.

आपणच पालिकेचे सर्वेसर्वा असल्याच्या अविर्भावात वावरणार्या या महाशयांचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील प्रतापही आता चर्चेत येत आहेत.
त्यामुळे पोलिसांनी सदरील प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेवून त्याचा सखोल तपास करण्याची गरज आहे. संबंधित ठेकेदाराने पालिकेला न विचारताच परस्पर काम सुरु केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत आहे. त्याची सत्यता तपासण्याची गरज असून त्यातून पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाची भूमिका उजेडात येण्याची शक्यता आहे. मात्र संगमनेर शहर पोलिसांचा तपासाबाबतचा आलेख पाहता अशाप्रकारचा तपास होवून मृत तरुणांना पूर्ण न्याय मिळण्याची अपेक्षा धूसरच आहे.

मनमानी पद्धतीने मनाला वाट्टेल तेथील गटार उचकटणार्या मुश्ताक शेख, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातंर्गत गटारांच्या कामाचे मुख्य ठेकेदार रामहरी कातोरे व त्यांचा मुलगा निखिल यांच्यावर सदोष मनुष्यवधासह भारतीय न्यायसंहितेच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला व एकाला अटकही झाली. या घटनेमागे पालिकेतील अधिकार्यांचा हात आहे याबाबत संगमनेरच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी संशय व्यक्त केला आहे. त्याची तपास अधिकार्यांनी गांभीर्याने दखल घेवून या घटनेचा तपास करताना पालिकेच्या आरोग्य विभागाची भूमिकाही तपासण्याची गरज आहे.

सदरची दुर्दैवी घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.10) कोल्हेवाडी रस्त्यावर घडली होती. या घटनेला आता आठवडा उलटला आहे, मात्र पालिकेने अद्यापही त्या गटाराचे तोंड बंद केले नसून चारही बाजूने अडथळे उभारुन वाहतुकीला अडचण निर्माण करुन ठेवली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात एखादा अपघात घडण्याची शक्यता असल्याने सदरच्या गटाराचे काम तत्काळ पूर्ण करुन ते बंद करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

