पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना
संगमनेर : पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींना रंगविण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर करावा लागत असल्याने मूर्ती आणि रंग या दोहींमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या मूर्तींच्या विक्रीत घट होत आहे. त्याला पर्याय म्हणून अनेकजणांचा कल शाडूमातीच्या मूर्ती घेण्याकडे असतो. संगमनेरचे पत्रकार नितीन ओझा यांनी यंदा मात्र पर्यावरणपूरक श्रींचा शोध घेत थेट शेणामातीचीच मूर्ती हुडकून काढल्याने त्यांच्या प्रयत्नांचे आणि पर्यावरण प्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिर्डीतून आणलेली ही देखणी मूर्ती घरातील पाण्याच्या बादलीतही अगदी काही क्षणात विरघळते. त्यामुळे विसर्जनाच्या दिनी या मूर्तीचे विधीपूर्वक घरातच विसर्जन करुन ते पाणी झाडांना घालण्याचा व वर्षभर पर्यावरण गणेशाची पूजा बांधण्यासह दरवर्षी शेणामातीच्याच गणरायाची स्थापना करण्याचा मानस ओझा परिवाराने व्यक्त केला आहे.