रविवारच्या झंझावातानंतर पाणलोटातील पावसाचा जोर ओसरला

रविवारच्या झंझावातानंतर पाणलोटातील पावसाचा जोर ओसरला
संगमनेर खुर्दच्या प्रवरा पुलावरुन दोघे वाहून गेले, एकाला वाचवले तर दुसरा अद्यापही बेपत्ता
नायक वृत्तसेवा, अकोले
शनिवारी सायंकाळपासून पाणलोटात हस्ताने तांडव घातल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली होती. मात्र रविवारच्या चित्रा नक्षत्राने वातावरणीय नूर पालटल्याने शनिवारी रात्रभर धोऽधो कोसळणार्‍या जलधारांना रविवारी खीळ बसली. त्याचा परिणाम काल सकाळी सोडण्यात आलेला सुमारे तेरा हजार क्युसेक्सचा विसर्ग अवघ्या काही तासांतच कमी करीत आज सकाळी थेट चार हजार क्युसेक्सपर्यंत खाली आणावा लागला. सध्या पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असून लाभक्षेत्रात तर चक्क निरभ्र आकाशातून सूर्यनारायणाने दर्शन दिले आहे. रविवारी प्रवरेला मोठा पूर आल्याने संगमनेर खुर्दनजीकच्या प्रवरा पात्रातील छोटा पूल पाण्याखाली गेला होता. तो ओलांडण्याचा प्रयत्न करणारे दोघे वेगवान प्रवाहात वाहुन गेले. त्यातील एकाला वाचण्यात यश आले तर दुसर्‍याचा हकनाक बळी गेला.


गेल्या पंधरवड्यापासून अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील पावसात वाढ झाल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांनी जवळजवळ आपली सर्वोच्च पातळी धारण केली आहे. परंपरेनुसार धरणाच्या पालोटात 30 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठे तांत्रिक पातळीवर नियंत्रित करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार गोदावरीच्या उर्ध्वभागातील भंडारदर्‍याने 16 ऑगस्टरोजी तांत्रिक पातळी गाठताना सर्वात आधी ओसंडण्याचा मान मिळवला. त्यामुळे गेल्या 16 ऑगस्टपासून धरणाच्या सांडव्याद्वारे कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सोडला जात असल्याने निळवंडे धरणही तांत्रिक पातळीच्या जवळपास पोहोचले आहे. मात्र धरणाच्या सुरक्षिततेसाठी सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा 88 टक्क्यांवर नियंत्रित करुन उर्वरीत पाणी प्रवरानदीपात्रात सोडले जात आहे.


शनिवारी दिवसभर भंडारदर्‍याच्या पाणलोटात धोऽधो जलधारा कोसळल्यानंतर रात्रीही त्यात सातत्य राहिल्याने रविवारी (ता.23) सकाळी भंडारदर्‍याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग तब्बल 7 हजार 740 क्युसेक्सवर नेण्यात आला होता. त्यामुळे निळवंडे धरणातूनही तब्बल 12 हजार 945 क्युसेक्सने विसर्ग सोडला गेला. मात्र या दरम्यान नक्षत्र बदलात हस्ताचा वेग चित्राने गमावला आणि पाणलोटातील पावसाने उसंत घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही रोडावल्याने अवघ्या काही तासांतच धरणाच्या सांडव्याचे दार पुन्हा करकरत खाली नेण्यात आले. आज सकाळी सहा वाजता भंडारदर्‍यातून 3 हजार 933 क्युसेक्स तर निळवंडे धरणातून 4 हजार 25 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरुन प्रवरानदीपात्रात 5 हजार 711 क्युसेक्सने पाणी वाहत असून हे सर्व पाणी जायकवाडीच्या जलाशयात सामावत आहे.


रविवारच्या तुलनेत मुळा खोर्‍यातील पावसाचा जोरही मंदावल्याने कोतूळनजीकच्या मुळापात्रातील प्रवाहही दिवसभरात संकुचित झाला. रविवारी सकाळी 8 हजार 373 क्युसेक्सने वाहणार्‍या पाण्यात आज सकाळपर्यंत मोठा फरक पडला. आज सकाळी सहा वाजता मुळा नदीपात्रातून 5 हजार 368 क्युसेक्स पाणी वाहत असून मुळा धरणाचा पाणीसाठा 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा तांत्रिक पातळीवर पोहोचण्याची शक्यता असून त्यानंतर जायकवाडीसाठी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्यावर्षीही जायकवाडीचा महाकाय जलाशय तुडूंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


हस्त नक्षत्राने अकोले तालुक्याच्या पूर्व व पश्चिम घाटमाथ्यांना अक्षरशः धुवून काढल्याने रविवारी नद्यांचे पात्र कमालीचे फुगले होते. त्यामुळे काल सकाळपासून निळवंडे धरणातून 12 हजार 945 क्युसेक्स पाणी सोडले जात होते. त्याचा परिणाम धांदरफळ व संगमनेर खुर्द येथील पुल पाण्याखाली गेले. पुलावरुन पाणी वाहत असतांनाही धांदरफळ येथे काहींनी दुचाकीसह पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यातील चौघे वाहून जात असताना त्यांना वाचवण्यात आले, तर संगमनेर शहरलगतच्या शांती घाटाजवळील छोट्यापुलावर दुचाकीसह जात असलेल्या कोल्हेवाडीच्या सुनील चांगदेव आहेर (वय 27) व शरद धोंडीबा कोल्हे हे दोघेही आपल्या दुचाकीवरुन (क्र.एम.एच.17/ए.एस.6728) संगमनेर खुर्दचा पूल ओलांडीत असल्याने वेगवान प्रवाहात ते दुचाकीसह वाहून गेले. त्यातील सुनील आहेर याला पुणे नाक्यावरील मोठ्या पुलाजवळ वाचवण्यात आले तर शरद कोल्हे मात्र दुचाकीसह वाहून गेला. त्याचा अद्यापही थांगपत्ता लागला नसल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये) घाटघर 60, रतनवाडी 48, पांजरे 70, भंडारदरा 52, वाकी 80, निळवंडे 71, आढळा 5 व अकोले येथे 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 22 हजार 887 द.ल.घ.फूट, भंडारदरा 10 हजार 681 द.ल.घ.फूट, निळवंडे 7 हजार 266 द.ल.घ.फूट, आढळा 1 हजार 60 द.ल.घ.फूट (ओव्हरफ्लो) तर भोजापूर 482 द.ल.घ.फूट (ओव्हरफ्लो) झाला होता.

 

Visits: 11 Today: 1 Total: 80025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *