देवळाली प्रवरात होणार स्वतंत्र पोलीस ठाणे? गृह मंत्रालयाकडून हिरवा कंदील; सुनील कराळेंचा पाठपुरावा

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, यासाठी शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांच्या गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला लवकरच यश येणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

देवळाली प्रवरा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, या मागणीसाठी सुनील कराळे यांचा लढा सुरू आहे. याबाबत त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता देखील केलेली आहे. तत्कालिन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत मंत्रालयात बैठक देखील झाली होती. त्यावेळी पोलीस ठाणे होण्यासाठी हिरवा कंदील गृह मंत्रालयाने दाखविल्याने कार्यवाही सुरू झाली होती. परंतु त्यानंतर कुठं माशी शिंकली काही समजले नाही आणि हे घोंगडे पुन्हा भिजत पडले. हिवाळी अधिवेशनात आमदार लहू कानडे यांनी देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करावे, अशी मागणी विधानसभेत केली. त्यांच्या मागणीची गृह विभागाने दखल घेतली असल्याचे खात्रीशीररित्या समजले आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर मतदारसंघाला जोडली गेली. या गावांना तहसील राहुरी आहे. मात्र मतदान श्रीरामपूरमध्ये करावे लागते. तहसील राहुरी असल्याने पोलीस ठाणे देखील राहुरीच आहे. देवळाली प्रवरा हे वरील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे झाले तर देवळाली प्रवरासह 32 गावांचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याने स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी कराळे यांनी दहा वर्षांपासून लढा सुरू ठेवला आहे. आता त्या लढ्याचे चीज होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू व्हावे; यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून एकटा लढा देत आहे. यामध्ये मला कोणत्याच गावपुढार्याने साथ दिली नाही किंवा मदत देखील केली नाही. उलट होत असलेल्या कामात श्रेयवादासाठी खोडा घालण्याचे काम केले. आता आमदार लहू कानडे या लढ्यात सामील झाल्याने लवकरात लवकर पोलीस ठाणे सुरू होईल. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
– सुनील कराळे (शहराध्यक्ष-शिवसेना)
