बहुप्रतिक्षित ‘पुणे-नाशिक’ द्रुतगती रेल्वेमार्गाचे आणखी एक पाऊल पुढे! पुणे जिल्ह्यातील सुमारे सहाशे हेक्टर जमिनीवरील सर्वेक्षण पूर्ण, प्रशासन भूसंपादनाच्या तयारीत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वमार्गाच्या भूसंपादनासाठी सर्वेक्षणाची पुणे जिल्ह्यातील प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्याचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडला (महारेल) सोपविण्यात आला आहे. या अहवालाच्या अध्ययनातून संपादित करावयाच्या जमिनींचे मूल्य ठरवून त्यानूसार निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रीया सुरु होणार आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासोबतच निधीची कमतरता भासू देणार नाही असे यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. कोविडमुळे रखडलेली नाशिक व नगर जिल्ह्यातील सर्वेक्षणाची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होवून प्रत्यक्ष या द्रुतगती रेल्वमार्गाच्या कामाचा शुभारंभ होईल.

नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून जाणार्‍या या द्रुतगती रेल्वेमार्गासाठी या तीनही जिल्ह्यातील 1 हजार 470 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यातील 575 हेक्टर जमीन पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आहे. या संपूर्ण जमिनींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी वरील चार तालुक्यांच्या उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगरमधून जाणार्‍या रेल्वेमार्गासाठीही भूसंपादन अधिकारी म्हणून संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती झालेली आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे कामही पूर्ण होईल व या बहुप्रतिक्षित द्रुतगती रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात होईल.

सुधारित मान्यतेनुसार या द्रुतगती जलद रेल्वेमार्गावर धावणार्‍या गाड्यांचा ताशी वेग 200 किलोमीटर प्रतितास असणार आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार्‍या या लोहमार्गामुळे शिक्षण, व्यवसाय, नोकरी व शेतीमाल या सर्वच क्षेत्रांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. नाशिक ते पुणे या दोन महानगरांमधील प्रवासाचा दीर्घ कालावधी काही तासांवर येणार असल्याने आर्थिकदृष्ट्या या मार्गाचा मोठा फायदा या तिनही जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. राज्यातील रेल्वेमार्गांच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या महारेलने निधी प्राप्त होताच विक्रमी वेळेत या लोहमार्गाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पुणे जिल्ह्याने आपल्या भागातील सर्वेक्षण आटोपून एक टप्पा गाठला आहे. आता नगर व नाशिक जिल्ह्यातील अहवालांची प्रतीक्षा आहे.

235 किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकाचेवेळी दुहेरी लोहमार्गाचे इलेक्ट्रिक कामही पूर्ण केले जाणार असल्याने शुभारंभ झाल्यापासून बाराशे दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महारेलने ठेवले आहे. या दुहेरी रेल्वेमार्गावर 18 बोगदे, 41 उड्डाण पूल व 128 भुयारी मार्ग असणार आहे. या मार्गासाठी लागणारा निधी 60 टक्के वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे यांचा प्रत्येकी 20 टक्के वाटा अशा माध्यमातून पैसा उभारला जाणार आहे. कृषी व व्यापार क्षेत्राला संजीवनी देण्यासोबतच पुणे व नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचे अंतर मिनिटांवर येणार असल्याने संगमनेर तालुक्यातील सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. त्यामुळे हा रेल्वेमार्ग बहुप्रतिक्षित बनला आहे.

Visits: 433 Today: 1 Total: 1803939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *