वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे अखेर नियंत्रण कक्षात संगमनेरचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अकोल्यात वर्णी
महेश पगारे, अकोले
वर्षभराच्या छोटेखानी कारकिर्दीतही सतत वादग्रस्त राहिलेले व ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्याच सरकारी वाहनाच्या चालकाच्या मुखातून अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेले अकोल्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संगमनेरातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले पेालीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती अकोल्याची सूत्रे सोपविण्यात आली आहे. अरविंद जोंधळे यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढणार्या कथित ऑडिओ क्लिपचे सविस्तर वृत्त आपल्या 15 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘त्या’ वृत्ताने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळही उडाली होती. त्याचा परिपाक पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अपेक्षेप्रमाणे अवघ्या दहाच दिवसांत त्यांची उचलबांगडी केली आहे. त्या सेाबतच त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरलेला व अकोले पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार्या ‘त्या’ पोलीस शिपायालाही निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिलेले दिग्गज नेते माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अकोल्याचे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यातील राजकीय संघर्ष कायमच सुरू असतो. त्यातून अनेकवेळा तणावासारखी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. त्यातच अकोले तालुका हा आदिवासीबहुल असल्याने येथे अवैध व्यवसायांसह गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. या सर्व घटकांवर पोलीस निरीक्षक परमार कशा पद्धतीने नियंत्रण मिळवितात व राज्याच्या राजकारणातील अकोल्यातील दिग्गजांना कशाप्रकारे हाताळतात यावरच अकोल्यातील त्यांची कारकीर्द अवलंबून राहणार आहे. संगमनेरातील कारकिर्दीत धाडसी अधिकारी अशी त्यांची ओळख झाली असली तरीही प्रत्यक्षात मात्र त्यांच्या कार्यकाळात अपवाद वगळता गुन्ह्यांचे तपास लागलेले नाहीत. गेल्या कालखंडात अकोल्यात घडलेल्या विविध घटनांचा विचार करता काही गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी नगरची स्थानिक गुन्हे शाखा अथवा पूर्वाश्रमीचे राजूर पेालीस ठाण्याचे सहाय्यक पेालीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी ते तपास तडीस लावल्याचा इतिहास आहे. संगमनेरातील अनुभव लक्षात घेता अकोल्यातील अशा घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हानही पोलीस निरीक्षक परमार यांच्यासमोर असणार आहे. कोणालाही अंगावर घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते यात यशस्वी होतील असा अकोलेकरांना विश्वास आहे.
अकोले तालुका क्षेत्रफळाने मोठा असल्याने अकोले व राजूर अशी दोन पोलीस ठाणी कार्यरत आहेत. परंतु, गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अक्षरशः लयास गेली होती. आता धडाकेबाज पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी आपल्या कामगिरीची येथेही झलक दाखवून गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी अपेक्षा यानिमित्ताने अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.