लाखो साईभक्तांनी प्रसादालयामध्ये घेतला भोजनाचा लाभ मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यापासून नियमांचे पालन करुनच प्रवेश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
लॉकडाऊननंतर साईभक्तांसाठी शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत 91 हजार 136 साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर याकाळात शिर्डी येथील श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ही माहिती दिली.
लॉकडाऊननंतर राज्य सरकारच्या आदेशान्वये 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी काही अटी-शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजून कोरोना विषाणूचे सावट संपले नसल्यामुळे शिर्डी येथे दर्शनाकरीता नियमावलीचे पालन करुन ठराविक संख्येनेच भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाच्या पदाधिकार्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन साईभक्तांना साईबाबा संस्थानच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे.
त्यातच 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर याकालावधीत 91 हजार 136 साईभक्तांनी ऑनलाईन, टाईम बेस व सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातून साईदर्शनाचा लाभ घेतला आहे. तर शिर्डीच्या साईप्रसादालयामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच या कालावधीत संस्थानचे साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांद्वारे 21 हजार 124 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही बगाटे यांनी सांगितले.