तालुक्यातील शंभर कोविड बाधित गावांतील रुग्णसंख्या ‘शून्य’! गुरुवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येने घेतली पुन्हा एकदा उसळी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळी खरेदीने अपेक्षेपूर्वीच सुरू केलेल्या कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेचा संचार संगमनेर तालुक्यात कायम असून शहर आणि ग्रामीण भागात दररोज नवीन रुग्ण समोर येण्याचा सिलसिला अव्याहत आहे. गुरुवारीही शहरातील तेरा जणांसह 46 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 279 झाली असून तालुक्यातील बाधितांचा एकूण आकडा 5 हजार 75 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत बाधित झालेल्या तालुक्यातील 159 पैकी 100 गावांमधील रुग्णसंख्या शून्य झाली आहे. उर्वरीत एकोणसाठ गावांमध्ये 279 रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोविडला दिवाळीच्या निमित्ताने नियम डावलून गर्दी करीत संगमनेरकरांनी आवतणं धाडलं. त्यामुळे दिवाळीच्या अगदी दुसर्याच दिवशी कमी होणार्या तालुक्यातील रुग्णसंख्येचा आकड्यांना पुन्हा भरतीच्या दिशेने वळविले. त्यामुळे एकवेळ संक्रमण आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असताना आज मात्र पुन्हा परिस्थिती अनियंत्रित होण्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. एकूण लोकसंख्येनुसार तालुक्यातील किमान एक टक्का नागरिक संक्रमित होतील असा अंदाज सुरुवातीला वैद्यकीय जाणकारांनी वर्तविला. तो जवळजवळ सत्यात उतरतोय असेच चित्र 15 नोव्हेंबरपर्यंत दिसत होते.
मात्र रुग्णसंख्या कमी होवू लागल्याने त्याचा उलटा अर्थ काढून जणू कोविडचे संक्रमण ओसरल्याचे गृहीत धरुन संगमनेरकरांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली. त्याचा परिणाम थोपलेले कोविड विषाणू पुन्हा सक्रीय झाले आणि त्याने दररोजच्या रुग्णगतीलाही दुप्पट वेग मिळाला. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून दिवाळीच्या दुसर्या दिनापर्यंत तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रित होती. या पंधरा दिवसांच्या कालावधीत तालुक्यात 22.47 रुग्ण दररोज या गतीने अवघ्या 337 रुग्णांची भर पडली. यात शहरी रुग्णसंख्या 86 (5.73 रुग्ण रोज) व ग्रामीण रुग्णसंख्या 251 (16.73 रुग्ण रोज) या वेगाने वाढली.
मात्र दिवाळीनंतरच्या दिवसापासून म्हणून 16 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या अकरा दिवसांच्या कालावधीत संक्रमणाची गती आणखी वाढून तालुक्यात सरासरी 41 रुग्ण समोर येवू लागले. या अकरा दिवसांच्या कालावधीत केवळ ग्रामीणभागाच नव्हे तर शहरी भागाच्या रुग्णगतीतही वाढ झाली. या अकरा दिवसांत तालुक्यात 452 रुग्ण समोर आले. यात शहरातील 121 (11 रुग्ण रोज) व ग्रामीण भागात 331 (30 रुग्ण रोज) या गतीने रुग्ण वाढत राहीले. त्यामुळे तालुक्याने अनपेक्षितपणे पाच हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडीत आता 51 व्या शतकाच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे.
गुरुवारी (ता.26) खासगी प्रयोगशाळेचे बारा, शासकीय प्रयोगशाळेचे दहा आणि रॅपिट अँटीजेन चाचणीद्वारा चोवीस जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील तेरा तर ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर मधील 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 37 वर्षीय तरुण, पुणे नाक्यावरील 50 वर्षीय इसम, स्वामी समर्थ नगरमधील 16 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवी गल्लीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील 20 वर्षीय तरुणी, सह्याद्री महाविद्यालय जवळील 46 वर्षीय दोन इसम आणि केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्या 48 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
यासोबतच ग्रामीणभागातून गुरुवारी तब्बल 33 रुग्ण समोर आले. त्यात सोनुशी येथील 23 वर्षीय तरुण, आश्वी बु. मधील 69 वर्षीय इसम, चिखलीतील 53 व 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालिका, 40 वर्षीय तरुणासह 13 वर्षीय मुलगा, जोर्वे येथील 31 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 52 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 12 वर्षीय बालिका, खंदरमाळ येथील 32 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपरणे येथील 50 वर्षीय इसम, कनोली येथील 37 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 52 वर्षीय इसमासह 44 वर्षीय तरुण, 66 व 35 वर्षीय महिला, वाघापूर येथील 58 वर्षीय इसम.
कासारा दुमाला येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळी येथील 62 व 50 वर्षीय इसम आणि 32 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 27 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 42 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 55 वर्षीय महिला, खळी येथील 53 वर्षीय इसम, घारगाव येथील 35 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे 53 वर्षीय इसम व चिकणी येथील 38 वर्षीय तरुणाला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी कमी रुग्णसंख्येचा मिळालेला दिलासा गुरुवारी नाहीसा झाल्याने रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उसळी घेत 51 व्या शतकाच्या दिशेने वाटचाल करीत 5 हजार 75 रुग्णसंख्या गाठली आहे. यातील 279 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.
संगमनेर तालुक्यात आजवर 5 हजार 75 रुग्ण समोर आले आहेत. त्यासाठी प्रशासनाने खासगी व शासकीय प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 26 हजार 582 संशयितांची स्राव तपासणी केली. त्यातून 19.09 टक्के सरासरीने वरील रुग्णसंख्या समोर आली आहे. त्यातील 4 हजार 759 रुग्णांनी आजवर उपचार पूर्ण केले असून रुग्ण बरे होण्याची तालुक्यातील सरासरी आता 93.66 टक्के आहे. दुर्दैवाने या कालावधीत कोविडने 43 जणांचा बळीही घेतला. मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून कोविडच्या मृत्यूदरातही मोठी घसरण झाली असून सध्या तालुक्यातील कोविड मृत्यूदर अवघा 0.85 टक्के आहे. एकूण रुग्णसंख्येतील 1 हजार 403 रुग्ण शहरी (सक्रीय 86) तर 3 हजार 672 रुग्ण ग्रामीण (193 सक्रीय) भागातील आहेत. तालुक्यातील बाधित शंभर गावांमध्ये शून्य रुग्णसंख्या असून उर्वरीत 59 गावांमध्ये 279 रुग्ण सक्रीय आहेत.