… अखेर बोधेगावातील ‘त्या’ आजीबाईंना साखर मिळाली! चुकीच्या माहितीमुळे गोंधळ; जुन्या व्हिडिओबद्दलही केला खुलासा
नायक वृत्तसेवा, शेवगाव
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावतीने त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या साखर वाटप उपक्रमात गोंधळ झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये एक आजीबाई याबद्दल संताप व्यक्त करताना दिसल्या. मात्र, आता बोधेगाव (ता. शेवगाव) येथील या आजीबाईंनी आपल्याला विखे पाटील यांच्याकडून साखर मिळाली असल्याचे म्हटले आहे. उलट काही कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याने आमचा गोंधळ उडाल्याचेही आजीबाई नवीन व्हिडिओत सांगत आहेत.
दिवाळीत शिर्डी मतदारसंघात साखर वाटप केल्यानंतर विखे पाटील यांच्यावतीने आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात साखर वाटप सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात रेशनकार्ड धारकांना साखर आणि चनादाळ वाटप करण्यात येत आहे. ही सरकारी योजना नव्हे तर विखे पाटील स्वखर्चाने हे वाटप करीत असल्याचे सांगण्यात आले. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मतदारसंघात दुसरी दिवाळी साजरी करण्याचा विखे पाटील यांचा मानस असून त्यानिमित्त साखर वाटप सुरू आहे.
मात्र, या उपक्रमात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गोंधळ झाल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात संताप व्यक्त करणार्या आजीने आपल्याला १९ तारखेला साखर मिळाल्याचे म्हटले आहे. जुन्या व्हिडिओबद्दल खुलासा करताना त्यांनी म्हटले आहे की, त्यावेळीच येथे साखर वाटप करण्यात आली होती. परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडला. आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत. यापुढेही राहू, आम्हांला साखर मिळाली आहे.