भुतडा बंधुंच्या दातृत्त्वाने चंपाषष्ठी उत्सवाला सोन्याची झालर! संगमनेरातील साळीवाडा परिसरात मल्हारी मार्तंडांच्या विवाहासह मंदिराच्या जिर्णोद्धाराचा शुभारंभ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येळकोट येळकोटचा जयघोष, मल्हारी मार्तंडरुपी खंडोबारायांचा जयजयकार आणि भंडार्‍याची उधळण अशा भक्तिपूर्ण वातावरणात संगमनेरातील जागृत देवस्थान असलेल्या साळीवाड्यात रविवारी चंपाषष्ठी उत्सव साजरा झाला. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने सगळे निकष तंतोतंत पाळले होते, त्यामुळे हजारों भाविकांची उपस्थिती लाभणार्‍या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला यंदा कात्री लावण्यात आली होती. सध्या येथील पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून चंपाषष्ठीच्या निमित्ताने अनेक खंडोबाभक्तांनी आर्थिक व वस्तुरुपी दानही केले. या दानात मंदिरालगत राहणार्‍या भुतडा बंधुंनी देवाच्या दीपामाळेसाठी केलेल्या ‘भूदाना’ने यंदाच्या उत्सवाला सोन्याची झालर लागली. याबाबतचे संमतीपत्र डॉ.योगेश भुतडा यांनी मंदिर विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष मदनलाल पारख यांच्याकडे सोपविताच खंडोबाभक्तांनी भंडार्‍यांची उधळण करीत सदानंदाचा जयघोष केला.


प्राचीन व ऐतिहासिक घटनांचे केंद्र राहीलेल्या संगमनेरात अनेक प्राचीन वास्तु व मंदिरे आहेत. शहरातील प्रवराकाठी असलेल्या काही मंदिरांचा आणि नदीवरील घाटांचा जिर्णोद्धारही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांनी केल्याचे दाखले इतिहासाच्या पानात मिळतात. अशाच प्राचीन आणि जागृत ठिकाणांपैकी एक असलेले साळीवाड्यातील खंडोबा मंदिर तालुक्यातील हजारों भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभरातील विविध उत्सवांसह या ठिकाणी चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवाचे सहा दिवसांचे घट बसविण्यात आले होते. रविवारी त्याच्या सांगतेसह चंपाषष्ठीचा उत्सव आणि मार्तंडरुपी देवासह म्हाळसादेवीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.


गेल्या सहा दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आटोपशीर कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी परिसरातील भाविकांच्या घराघरातून तेल हंडा फिरवण्यात आला, त्यात भाविकांनी श्रद्धेने तेल ओतले. रात्री याच तेलाचे तेलवण करुन देवाला हळद लावण्यात आली. रविवारी (ता.20) मुख्य उत्सवाच्या दिवशी सकाळी देवाची वाजतगाजत वर मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर म्हाळसादेवीबरोबर देवाचा थाटात विवाह सोहळाही पार पडला. जमलेल्या भाविकांनी अक्षता आणि भंडार्‍याची उधळण करीत येळकोट.. येळकोट.. जय मल्हार असा घोष करीत परिसरातील वातावरण भक्तिमय करुन टाकले होते.


दरवर्षी चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी खंडोबारायांचा विवाह पार पडल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीतं, कांद्याची पात, मसाले भात आणि बुंदी अशा व्यंजनांचे प्रसादरुपी भोजन ग्रहण करण्यासाठी संपूर्ण शहर आणि पंचक्रोशीतील भाविक येथे मोठी गर्दी करीत असतात. हजारों भाविकांच्या दिवसभराच्या उपस्थितीने हा परिसर गर्दीने ओसंडलेला असतो. यंदा मात्र सर्वच धार्मिक व सार्वजनिक उत्सवांवर कोविडचे संकट असल्याने येथील सर्वच कार्यक्रमांचा डामडौल अगदी मर्यादीत स्वरुपात करण्यात आला होता. दरवर्षीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमालाही यंदा फाटा देत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना भात व लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.


दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना मुखपट्टी (मास्क) व सामाजिक अंतराचे बंधन पाळणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने काही स्वयंसेवकांची नियुक्ति केली होती, त्याद्वारे दिवसभर या दोन्ही नियमांचे अगदी तंतोतंत पालन केले गेले. यासाठी लाऊडस्पिकरद्वारा भाविकांना वारंवार आवाहनही केले जात होते. त्यासोबतच मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी यथाशक्ति दान देण्याचे आवाहन भाविकांना केले गेले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जून्या छोटेखानी मंदिराच्या अगदी दर्शनीभागात स्वर्गीय जगदिश भुतडा यांच्या वाड्याचा भाग आहे. त्याजागी देवाची दीपमाळ असावी अशी खंडोबा भक्तांची इच्छा असल्याने ती जागा विश्‍वस्त संस्थेला मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. रविवारी चंपाषष्ठीच्या निमित्ताने त्याला मोठे यश मिळाले.


स्व.भुतडा यांचे मोठे पुत्र अ‍ॅड.राजेश व छोटे पुत्र डॉ.योगेश यांनी रविवारी सकाळी देवाच्या विवाह समारंभापूर्वीच विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष मदनलाल पारख व आप्पा केसेकर यांची भेट घेवून देवाच्या दीपमाळेसाठी अडसर ठरत असलेली आपली जागा देवाला विनामूल्य देवू केली. त्यासाठी दोन्ही भावंडांच्या सह्या असलेले संमतीपत्रही लागलीच त्यांनी देवाच्या साक्षीने विश्‍वस्त मंडळाच्या हाती सोपविले. हा प्रसंग जमलेल्या खंडोबाभक्तांसाठी दैवी चमत्कारापेक्षा कमी नव्हता, त्यामुळे याप्रसंगी पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट.. झाला आणि भंडार्‍याची उधळण करीत खोबर्‍याचा प्रसादही वाटप करण्यात आला.


येत्या वर्षभरात या जागृतस्थळी खंडोबारायांचे दिव्य मंदिर उभारले जाणार असून संगमनेरकर भाविकांनी त्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही यावेळी देवस्थान विश्‍वस्त समितीच्यावतीने करण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असणारा हा उत्सव प्रशासकीय सूचनांनुसारच साजरा व्हावा यासाठी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष मदनलाल पारख, सदस्य कैलास उर्फ आप्पा केसेकर, गोविंद भरीतकर, श्रीगोपाळ पडताणी, राजगोपाळ पडताणी, बाळासाहेब भुजबळ, सुभाष कर्पे, डॉ.राजेंद्र के. मालपाणी, भिकन गुंजाळ, प्रल्हाद जोर्वेकर, दिलीप गुंजाळ, खंडोबा भक्त संभाजी तनपुरे, भरत काळे, अण्णा रहाणे, शरद शिंदे, रमेश पावबाके, भाऊसाहेब अभंग, सुभाष ताजणे, शरद गुंजाळ, संजय कर्पे व पुरुषोत्तम जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

साळीवाड्यातील खंडोबा मंदिर संगमनेरकरांचे कुळदैवत आहे. अत्यंत जागृत असलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम भाविकांच्या भरवशावर सुरु करण्यात आले आहे. चंपाषष्ठीच्या दिनी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी आर्थिक व वस्तुरुपाने मदत जमा केली आहे. मात्र मंदिराचे प्रारुप मोठे असल्याने अजूनही मोठ्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. दर रविवारी येथे आरतीसाठी येणार्‍या भक्तांनी नव्याने उभारल्या जाणार्‍या मंदिरावर सोन्याचा कळस लावण्याचाही चंग बांधला आहे, खंडोबाभक्त आप्पा केसेकर यांनी एक तोळे सोने देत त्याचा शुभारंभही केला आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यात प्रत्येक संगमनेरकर भाविकाचा सहभाग असावा अशी विश्‍वस्त मंडळाची इच्छा आहे. भाविकांनी या पुण्यकार्यास सढळ हाताने मदत करावी.
मदनलाल पारख
अध्यक्ष : मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान सार्वजनिक ट्रस्ट, संगमनेर

Visits: 3 Today: 1 Total: 23098

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *