संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान उत्पादकांना शंभर टक्के ऑनलाइन पेमेंट दिल्याची घेतली दखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने डिजिटल अर्थव्यवस्था कार्यक्रम देशभर राबविला होता. या कार्यक्रमात देशपातळीवर अनेक सहकारी दूध संघांनी सहभाग नोंदविला होता. सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकर्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत दूध पेमेंट 100 टक्के ऑनलाइन पद्धतीने देण्याच्या प्रक्रियेत संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्यावतीने दुग्धक्रांतीचे जनक डॉक्टर व्हर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय दुग्ध दिनाच्या दिवशी दुग्ध विकास मंडळाचे आनंद (गुजरात) येथील मुख्यालयातून ऑनलाइन माध्यमाद्वारे राजहंस दूध संघाला अध्यक्ष दिलीप रथ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा राजहंस दूध संघाच्या सभागृहात ऑनलाइन पार पडला. यावेळी महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, साहेबराव गडाख, लक्ष्मण कुटे, मोहन करंजकर, विलास कवडे, विलास वर्पे, संतोष मांडेकर, अॅड.बाबासाहेब गायकर, माणिक यादव, पांडुरंग सागर, राजेंद्र चकोर, डॉ.गंगाधर चव्हाण, ताराबाई धुळगंड, कार्यकारी संचालक डॉ.प्रताप उबाळे, मुख्य व्यवस्थापक जी. एस. शिंदे व संघाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष देशमुख म्हणाले, डॉ.व्हर्गिस कुरियन यांचे दुग्ध उत्पादन क्षेत्रातील कार्य महान आहे. डॉ.अण्णासाहेब शिंदे व डॉ.व्हर्गिस कुरियन यांनी कृषी आणि दुग्ध क्षेत्रात क्रांती घडवून आणल्यामुळेच देशातील शेतकरी देशाचा कणा बनला आहे. डॉ.कुरियन यांनी गो-पालनाला व्यावसायिक स्वरूप देऊन देशातील शेतकर्यांना आर्थिक सक्षम बनवले आहे. त्यामुळे भारत देश आज दुग्ध व्यवसायात जगात अग्रेसर असल्याची ती पावती आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने केलेल्या सन्मानामुळे आज खर्या अर्थाने सहकार क्षेत्राची मान उंचावली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात शेतीसोबत दुग्ध व्यवसायात देखील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याठीचा मुख्य व्यवसाय झाला असून, दूध उत्पादकांच्या दुधाचे 100 टक्के पेमेंट राजहंस दूध संघाने पती व पत्नीच्या एकत्रित बँक खात्यात वर्ग करून करून देशाच्या ऑनलाइन अर्थव्यस्थेसोबत महिलांचाही आदर सन्मान कायम राखला आहे.

राजहंस संघाने दूध उत्पादक शेतकर्यांना संकट काळात दुधाला सर्वाधिक भाव देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. संघाच्या माध्यमातून मॉडर्न डेअरी फार्म, मुक्तसंचार गोठा, पोषक चारा निर्मिती अभियान, काविळ लसीकरण, जंत व गोचिड निर्मूलन अभियान, दुष्काळी भागात चारा छावणी, मुरघास निर्मिती अभियान, माफक दरात जनावरांचे औषधे उत्पादकांना मिळावे यासाठी राजहंस मेडिकल स्टोअर, माफक दरात मिनरल मिक्चर व पशुखाद्य यांसारख्या विविध योजना दूध संघाकडून राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


संगमनेरातील सहकार क्षेत्रामुळे येथील आर्थिक सुबत्ता मिळाली आहे. त्याचाच परिपाक म्हणून राजहंस दूध संघाने ऑनलाइन अर्थव्यवस्थेचा धागा पकडून पती व पत्नीच्या बँक खात्यात दुधाचे पेमेंट वर्ग करुन महिलांचाही सन्मान राखला आहे. यापुढेही दूध संघ कायम उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रगतीपथावर राहील.
– रणजीतसिंह देशमुख (अध्यक्ष, महानंद व राजहंस दूध संघ)

राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम निमगाव टेंभी येथील म्हाळसाकांत सहकारी दूध संस्थेचे उत्पादक वसंत त्रिंबक शिंदे यांच्या बँक खात्यावर पेमेंट जमा केले होते. त्याबद्दल राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्यावतीने रोख रकमेचा धनादेश व प्रमाणपत्र संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले.

