डोळासणे महामार्ग पोलिसांची बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई स्पीडगन मशीनद्वारे कारवाई; 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्या बेशिस्त वानहचालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन मशीनद्वारे धडक कारवाई केली आहे. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 20 हजार 175 वाहनांवर मोटार वाहन कायदा व त्यांचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली असून, 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सदर कारवाईमध्ये 13 हजार 921 वाहनांवर अतिवेगाने वाहन चालविल्याने 1 कोटी, 39 लाख 21 हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणार्या 127 चालकांवर करवाई करुन त्यांच्याकडूनही 63 हजार 500 व वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्या 57 वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांचेकडूनही 11 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिली आहे.
अत्यंत रहदारी असणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करताना वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळली नसल्याने छोट्या-मोठ्या अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी डोळासणे महामार्ग पोलिसांना वाहनांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक स्पीडगन असलेली कार देण्यात आली आहे. ही कार महामार्गाच्या कडेला उभी करुन महामार्गावरुन धावणार्या वाहनांची वेगमर्यादा तपासतात. कारसाठी 90, बस व ट्रकसाठी 80, तर दुचाकीसाठी ताशी 70 किलोमीटरची वेगमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.
या नियमाचे उल्लंघन करणार्या वाहनांवर स्पीडगनद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकारला जात आहे. गेल्या अकरा महिन्यांत महामार्गावरुन धावणार्या लहान-मोठ्या अशा 20 हजार 175 वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली असल्याने त्यांच्याकडून 1 कोटी 60 लाख 50 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक) डॉ.भूषणकुमार उपाध्याय, पुणे महामार्ग पोलीस विभागाचे अधीक्षक संजय जाधव आणि महामार्ग पोलीस विभाग अहमदनगर मंडल यांच्या सूचनांनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.