आमदार रोहित पवारांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी! कोविडचे सर्व नियम पायदळी; कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष

नायक वृत्तसेवा, नगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून शुक्रवारी (ता.15) जामखेड येथे स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत आहे. शिवपट्टण किल्ला परिसरात हा कार्यक्रम पार पडतो आहे. पण, गेल्या 12 दिवसांपूर्वीच अहमदनगरमधील तब्बल 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आज सत्ताधारी आमदार रोहित पवारांच्या कार्यक्रमात झालेली गर्दी पाहून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अहमदनगरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे काही तालुक्यातील 61 गावांमध्ये हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या नियमावलीनुसार, गावामध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामध्ये स्वतः आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जतमधील दोन गावांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून सर्व कार्यक्रम केला जाणे अपेक्षित आहे. पण, आज रोहित पवारांच्या कार्यक्रमामध्ये हजारो लोकांची उपस्थित दिसली. सरकारने नियम शिथिल केले असले तरी अजूनही मास्क वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण, या कार्यक्रमामध्ये अनेकांच्या तोंडावर मास्कही दिसत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या अहमदनगरमधील कोरोना पूर्णपणे गेला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघामध्ये शिवपट्टण किल्ला परिसरात 74 मीटर उंच भगवा फडकविण्यात आला आहे. आमचा ध्वज सर्वसमावेशक आहे. जात-धर्म-पंथांच्या पलिकडे जाणारा आमचा ध्वज आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं. परंतु, गर्दीमुळे कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच कोविड नियमभंग होत असल्याने सरकार काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 79903

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *