संगमनेरात महाराष्ट्र युवक काँग्रेसचा स्नेहमेळावा उत्साहात संगमनेरकरांनी केलेल्या आदरातिथ्याने पदाधिकारी गेले भारावून

नायक वृत्तसेवा, संगमनेर
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांनी दोन दिवसीय स्नेहमेळावा व शिबिरात सहभाग घेतला. यावेळी संगमनेरमधील विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. यावेळी संगमनेरकरांनी केलेल्या आदरातिथ्याने युवक पदाधिकारी भारावून गेले.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरातील युवक व युवतींचा दोन दिवसीय अभ्यासदौरा व स्नेहमेळावा संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्य युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व विविध जिल्ह्यांमधील युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते. या भेटीमध्ये पदाधिकार्‍यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, शेतकी संघ, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, शॅम्प्रो, अमृतवाहिनी बँक, बसस्थानक, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय यांसह नामदार बाळासाहेब थोरात यांचे यशोधन संपर्क कार्यालय या विविध संस्थांना भेटी दिल्या.

यावेळी युवक कार्यकर्त्यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबोधित केले. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला समृद्ध परंपरा असून तरुणांना या पक्षामध्ये मोठी संधी आहे. प्रत्येक पक्षाला संकटातून जावे लागते. पण संकटामध्ये जो लढतो तो खरा सैनिक असतो. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे मोठे संघटन राज्यभर उभे राहिले आहे. सातत्याने राज्यभर फिरून विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क साधून त्यांनी युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. त्यामुळे नक्कीच युवक काँग्रेसला अधिक बळकट मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांनी राजकारण व समाजकारण हे गोरगरीब माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी केले. निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य नाही. जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे ध्येय ठेवून प्रत्येकाने काम करावे. आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचविण्याचे काम केले असून यामध्ये या पदाधिकार्‍यांचा मोठा सहभाग राहिला आहे. ग्रामीण विकास साधणारे संगमनेरचे सहकाराचे मॉडेल ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी आपण राबवा, शक्य तेवढी मदत करू असे ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांना विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती दिली. तर मालपाणी हेल्थ क्लब येथे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Visits: 195 Today: 1 Total: 1787652

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *