कळसूबाई शिखरावर युवकांचे व्यसनमुक्ती शिबिर उत्साहात व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकरांचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर संतवीर तथा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांचे 100 युवकांसह व्यसनमुक्ती शिबिर नुकतेच संपन्न झाले.

प्रतिवर्षी महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर व्यसनमुक्त युवक संघाचे युवक प्रतापी संस्कार शिबिर होत असते. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील युवक या शिबिरात सहभागी होतात व व्यसनमुक्तीचा संकल्प करतात. तात्यांच्या मार्गदर्शनाने ‘व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक’ हे ब्रीद घेऊन वारकरी विचार अंगीकारून जीवन जगतात. हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिबिर झाले नाही. तात्यांना ऐतिहासिक ठिकाणे, गड, किल्ले यांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. अकोल्यातून मुंबईकडे जात असताना नेहमी कळसूबाई शिखर त्यांना साद घालत होते, म्हणून आपला अपूर्ण राहिलेला संकल्प वयाच्या 69 व्या वर्षी न थकता व न बसता 2.30 तासात आपल्या 100 व्यसनमुक्त युवक सहकार्‍यांसोबत शिखर सर करत पूर्ण केला.

या शिबिरासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून युवक आले होते. रात्री चितळवेढे गावात माऊली आरोटे यांचेकडे मुक्काम करून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजता बारी गावातून प्रार्थना करून चढाईला सुरुवात केली. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘कळसूबाई माता की जय,’ ‘अगस्ति महाराज की जय’ अशा घोषणांचा निनाद करत वारकरी पताका घेऊन तात्यांनी व सहकार्‍यांनी कळसूबाई शिखर सर केले. शिखरावरचा निसर्गरम्य परिसर व वातावरण पाहून खूप समाधान व आनंद वाटला अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच पाणी व निसर्गाची मोठी देण अकोल्याला लाभली आहे अशी भावनाही व्यक्त केली.

मात्र, पर्यटक शिखरावर येताना कचरा करतात हे पाहून खेद व्यक्त करत, प्रत्येकाने आपली रिकामी पाण्याची बाटली व सोबत दिसेल तो कचरा खाली आणण्याचा संकल्प करून रस्त्यात भेटलेल्या प्रत्येक पर्यटकांना देखील प्रबोधन करुन कचरा न करण्याची विनंती केली. पुढच्या वर्षी हरिश्चंद्रगडावर शिबिर करण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी केला. माची जवळ येऊन भोजन घेऊन शिबिराचा समारोप केला. दोनवेळा मिष्टान्न भोजनाची व्यवस्था संतसेवक माऊली आरोटे यांनी केली व विशेष परिश्रम घेऊन हा संकल्प पूर्ण केल्याबद्दल तात्यांनी माऊलींचे विशेष कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *