पालिका निवडणूक शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढणार ः झावरे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोणत्याही परिस्थितीत आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे.

कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कृषी उत्पन्न बाजार निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा कुठलेही गटातटाचे राजकारण मनात न ठेवता केवळ शिवसैनिक म्हणून सर्व शिवसैनिकांनी एकीची वज्रमूठ बांधून निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे. येणार्‍या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन स्थानिक उमेदवार व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पक्षवाढीची संधी निवडणुकीच्या रुपाने मिळत असते. शिवसेनेने चारवेळा खासदार, तीनवेळा आमदार दिलेला आहे. यापूर्वी कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेची कुठलीही ताकद नसताना शिवसेनेने सहा ते सात नगरसेवक निवडून आणलेले आहेत. आज राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. पक्षाचे चांगले काम असून पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. नवीन युवक पुन्हा शिवसेनेकडे आकर्षित होत आहे. यामुळे शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्या माध्यमातून शिवसेना वाढीची संधी आहे. याचा लाभ आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. अनेक शिवसैनिकांचे त्यांच्या त्यांच्या भागात चांगले कार्य आहे. परंतु त्यांना संधी मिळत नाही त्यांना संधी मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे आगामी काळातील विकासाचे व्हिजन हा प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. या निर्णयामुळे कोपरगावातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सर्वच शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिवसेना नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव नगरपालिकांमध्ये स्वबळावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. कोणत्याही नगरपालिकेत आघाडी करण्यात येणार नाही.
– राजेंद्र झावरे (शिवसेना जिल्हाध्यक्ष, उत्तर नगर)

Visits: 122 Today: 1 Total: 1111942

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *